‘समाजातील प्रत्येक स्त्रीला कुटुंबाबरोबरच कामाची जबाबदारी देखील सांभाळावी लागते. घरापासून बाहेरच्या नवीन क्षेत्रात काम करताना प्रत्येक स्त्रीला संघर्ष करत संकटांना विलक्षण धर्याने तोंड देत, चिकाटीने पुढे जावे लागते. त्यातूनच ती आपल्या कार्यात प्रभावीपणे यश संपादन करू शकते,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक वीणा देव यांनी व्यक्त केले.
ज्योती कुलकर्णी रीसर्च फाउंडेशनतर्फे ‘ज्योती सन्मान’ दिनानिमित्त कर्तृत्ववान माहिलांचा गौरव करण्यात आला, या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमात सिंधुताई सपकाळ आणि डॉ. जयश्री तोडकर यांची विशेष उपस्थिती होती.
स्त्रियांच्या कर्तृत्वाला प्रेमाची आणि कौतुकाची थाप मिळणे अत्यंत गरजेचे असते. अशी कौतुकाची थाप मिळवल्यानंतर तिला काम करण्यासाठी अधिक बळ मिळते, यासाठीच ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनने अशी व्यक्तिमत्त्वं निवडून त्यांच्या कार्याचा केलेला सन्मान खरोखरच कौतुकास्पद आहे, असे वीणा देव यांनी सांगितले. ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनतर्फे दरवर्षी २७ ऑक्टोबर रोजी ‘ज्योती सन्मान दिन’ साजरा करण्यात येतो. या सोहळ्यात कृषी, उद्योग, पर्यावरण व कल्पकता आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनतर्फे सन्मानित करण्यात येते. यावर्षी पार पडलेल्या सोहळ्यात नंदा काळभोर यांना ज्योती कृषिकन्या पुरस्कार, सायली मुतालिक, सुहासिनी वैद्य, स्वाती ओतारी आणि आदर्श महिला बचत गट यांना ज्योती उद्योगिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पर्यावरण क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या अपर्णा वाटवे यांना ‘ज्योती वसुंधरा’ पुरस्कार देण्यात आला. नुकत्याच घेण्यात आलेल्या पुष्परचना या स्पध्रेतील ‘ज्योती फुलराणी’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सुधा वायचळ यांना, तर द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार सुजाता करमरकर आणि तेजस्विनी महाजन यांना आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार चित्रा वाघ व उल्का ओझरकर यांना प्रदान करण्यात आला.