|| भक्ती बिसुरे

सोनोग्राफी, क्ष-किरण सेवा खंडित; रेडिओलॉजिस्टचा अभाव

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सर्व सोयींनी युक्त असलेले सुसज्ज आणि सर्वात मध्यवर्ती रुग्णालय अशी कमला नेहरू रुग्णालयाची ख्याती आहे. मात्र प्रत्यक्षात सोनोग्राफी आणि एक्स-रे काढण्यासाठी आवश्यक क्ष-किरण तज्ज्ञ (रेडिओलॉजिस्ट) नाही, एक्सरे काढण्याची यंत्रणा उपलब्ध असली तरी ती बंद आहे आणि सर्व अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेला अतिदक्षता विभाग तयार असला, तरी तो कुलूपबंद असल्याचे चित्र ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.

कमला नेहरू रुग्णालयात येणारे बहुसंख्य रुग्ण हे सामान्य आणि निम्न आर्थिक गटातील आहेत. मोफत उपचार देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात रुग्णांना सुविधा कमी आणि मनस्तापच जास्त मिळत असल्याचे निष्पन्न होत आहे. येरवडा येथे वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय गरोदर महिलेने मोफत उपचारांच्या अपेक्षेने आपले नाव कमला नेहरू रुग्णालयात नोंदवले आहे. गरोदरपणात आवश्यक असलेली सोनोग्राफी करण्यासाठी रुग्णालयात आली असता येथे सोनोग्राफी करण्यासाठी कोणी नसल्याचे सांगून चिठ्ठी देऊन बाहेरील केंद्रावर पाठवण्यात आले. तेथे ३ वेळा सोनोग्राफी करण्यास दीड ते दोन हजार रुपये खर्च आला. पती मोलमजुरी करून कुटुंब चालवतात. अशा परिस्थितीत मोफत उपचार आणि तपासणी न मिळाल्याबद्दल या महिलेने ‘लोकसत्ता’शी बोलताना नाराजी व्यक्त केली.

सोनोग्राफी तपासणी करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ रुग्णालयात नसल्याने परिचारिकाच सोनोग्राफी करत असल्याचे देखील ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाहणीत समोर आले. एक्स-रे काढण्यासाठी यंत्रणा उपलब्ध आहे, मात्र त्यात बिघाड झालेला असल्याने एक्स-रे साठीही बाहेर पैसे खर्च करण्यावाचून रुग्णांना गत्यंतर नाही. सर्व आधुनिक यंत्र-सामग्रीने सुसज्ज अतिदक्षता विभाग देखील तयार आहे, पण प्रत्यक्षात तो चालवण्यासाठी यंत्रणा नसल्याने कुलूपबंद करून ठेवण्यात आलेला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे कायमस्वरूपी भूलतज्ज्ञ नाही. आरोग्य विभागातील भूलतज्ज्ञांची ५ ही पदे रिक्त असल्याने रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे हाल होतात. ‘ऑन कॉल’ उपलब्ध असलेल्या भूलतज्ज्ञांना पाचारण करणे किंवा महिलांना ससून रुग्णालयात पाठवणे हा एकमेव पर्याय रुग्णालयाकडे असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

नगरसेवक गणेश बीडकर म्हणाले, अनेक रुग्णालयांपैकी एक रुग्णालय म्हणून कमला नेहरू रुग्णालयाकडे न पाहता स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता देण्याची गरज आहे. त्यासाठी पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग यांनी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. अतिदक्षता विभागासारखी सुविधा उपलब्ध असताना मनुष्यबळ नसल्याने ती कार्यरत नाही. रुग्णालयाचा सामान्य नागरिकांना उपयोग होण्यासाठी त्या रुग्णालयात डॉक्टर असणे आवश्यक आहे, त्यामुळे आरोग्य विभागाने रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया वेगाने करावी, अशी अपेक्षा नगरसेवक योगेश समेळ यांनी व्यक्त केली.