वाद्यवृंद क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ लोकप्रिय असलेल्या ‘महेशकुमार अँड  पार्टी’चे संचालक महेशकुमार कनोडिया आणि नरेशकुमार कनोडिया या बंधूंचे निधन झाल्याने ऑर्केस्ट्रा क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. पुण्यातील वाद्यवृंद कलाकारांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

महेशकुमार कनोडिया (वय ८१) यांचे रविवारी (२५ ऑक्टोबर) तर नरेशकुमार कनोडिया यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांनी सुरू केलेल्या महेशकुमार अँड पार्टी या ऑर्केस्ट्राने १९७० ते १९९० च्या कालखंडात ‘हाऊ सफुल्ल’चे विक्रम प्रस्थापित केले होते. महेशकुमार हे लता मंगेशकर यांच्या गाण्यांसह विविध गायक-गायिकांच्या आवाजातील गाणी सादर करण्यासाठी प्रसिद्ध होते. नरेशकुमार हे गायनाबरोबरच नृत्य, निवेदन आणि मिमिक्री करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी या ऑर्केस्ट्राचे भारतभर तसेच परदेशात १५ हजारांहून अधिक कार्यक्रम केले होते. तसेच गुजराती चित्रपटसृष्टीत संगीतकार आणि गायक म्हणून त्यांनी कारकिर्द गाजविली होती. नंतरच्या काळात गुजरातच्या राजकारणामध्ये महेशकुमार तीन वेळा खासदार म्हणून तर नरेशकुमार हे आमदार म्हणून निवडून आले होते.