कचरा डेपोच्या विरोधात उरुळी येथील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्यावर संपूर्ण पुणे शहरात कचऱ्याचा मोठा प्रश्न लगेच उभा राहतो. शहरातील ७६ प्रभागांपैकी कात्रज हा एकमेव प्रभाग मात्र असा आहे की, या प्रभागात ही समस्या उभी राहू नये असा प्रयोग गेली चार वर्षे सुरू आहे आणि तो यशस्वी झाला आहे. कात्रज प्रभागातील कचरा ओला-सुका या पद्धतीने रोज गोळा होतो आणि या कचऱ्यावरील संपूर्ण प्रक्रिया देखील याच प्रभागात केली जाते. प्रभागातील कचरा बाहेर पाठवला जात नाही.
संपूर्ण शहरातील कचरा गोळा करून तो एकाच ठिकाणी प्रक्रियेसाठी पाठवण्याऐवजी शहरात काही ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणारे छोटे प्रकल्प उभे करावेत अशी चर्चा नेहमीच होते. त्या दृष्टीने ओल्या कचऱ्यापासून गॅस आणि त्यापासून वीज तयार करणारे छोटे प्रकल्पही शहरात कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र, त्यातील सर्वात यशस्वी आणि पथदर्शी प्रकल्प कात्रज प्रभागात सुरू आहे. शहरात छोटे-छोटे प्रकल्प ही संकल्पना अस्तिवात येण्याच्याही आधी या प्रभागाचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पुढाकार घेऊन ‘प्रभागातील कचरा प्रभागात’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला. ‘निर्मळ कात्रज-देखणं कात्रज’ हा किलरेस्कर कमिन्स इंडिया, ‘स्वच्छ’, ‘प्लॅस्टिक असोसिएशन’ आणि पुणे महापालिका यांचा संयुक्त उपक्रम आहे.
या प्रभागात इमारती, सदनिका, बंगले, दाट लोकवस्ती, गावठाण आणि झोपडपट्टी अशी मिश्र स्वरुपाची वस्ती आहे. हे लक्षात घेऊन सुरुवातीला सर्व घरांमधून प्रबोधन करण्यात आले. त्यासाठी सुरुवातीला किलरेस्कर कंपनीचे शंभर स्वयंसेवक एक महिना घरोघरी जाऊन हे प्रबोधन करत होते. त्यानंतर ‘स्वच्छ’ संस्थेमार्फत घराघरातून वर्गीकरण केलेला कचरा गोळा करण्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले. सुरुवातीला या उपक्रमाला विरोधही झाला. कारण प्रभागात असलेले सव्वीस कंटेनर कमी केले जाणार होते. मात्र, उपक्रम नेटाने सुरू ठेवला. वर्गीकरण केलेल्यापैकी सुका कचरा कचरावेचकांकडून विकला जातो आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून गॅस व वीज तयार होते. ही वीज कात्रज चौकातील हायमास्ट तसेच नवीन पुलावरील दिव्यांना पुरवली जाते. सध्या रोज पाच ते सहा टन कचऱ्यावर येथे प्रक्रिया केली जाते, अशी माहिती मोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ‘मेलहॅम इंजिनियरिंग’ ही कंपनी हा प्रकल्प चालवते. किलरेस्कर कंपनीने या उपक्रमाला आतापर्यंत जनरेटर तसेच कचरासंकलनासाठी गाडय़ा, गणवेश आदी विविध प्रकारचे साहाय्य वेळोवेळी केले आहे.
 
उपक्रमावर दृष्टिक्षेप..
शहरातील सर्वात मोठा प्रभाग (तेरा चौरस किलोमीटर)
प्रभागात छप्पन्न हजार सहाशे मतदार
सर्व घरांमधून कचरा गोळा करण्याची यंत्रणा
कचरा प्रक्रियेला आयएसओ मानांकन
कचऱ्यापासून गॅस आणि वीज, विजेवर रस्त्यावरील दिवे