राजा दिनकर केळकर संग्रहालयात प्रवेश करताना आतमध्ये किती दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे याचा अंदाज येत नाही, मात्र येथील प्रत्येक वस्तूचे वेगळेपण पाहून मी भारावून गेलो. संग्रहालयाला जागतिक दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे. लिंडनर यांनी दिले.

वॉल्टर जे. लिंडनर यांनी राजा दिनकर केळकर संग्रहालयाला भेट दिली. संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी वॉल्टर यांना संग्रहालयातील विविध दालनांचे दर्शन घडवले. यावेळी मुंबई येथील वाणिज्य दूतावासातील उप-वाणिज्य अधिकारी मार्गा आयनिग, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी अशुमी श्रॉफ आणि प्रादेशिक संचालक मीरा दळवी साहनी उपस्थित होत्या. वॉल्टर लिंडनर म्हणाले, संग्रहालयातील कलात्मक वारसा पाहून मी भारावून गेलो आहे. आपण कोणत्याही देशातून आलो तरी संस्कृतीशी संबंधित वस्तू आपल्याला आकृष्ट करतात. मी राजदूत असलो तरी संगीतकारही आहे. त्यामुळे वाद्य विभाग मला विशेष आवडला. संग्रहालयातील कलावैभव भारतीय संस्कृतीची श्रीमंती दाखवणारे आहे. राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे म्हणाले, अलीकडेच संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. संग्रहालय मध्यवस्तीत असल्याने जागेचा, पार्किंगचा, रहदारीचा प्रश्न आहे. मात्र बावधन येथील विस्तीर्ण परिसरात संग्रहालयाचा श्रीगणेशा होईल त्यावेळी हे प्रश्न सुटतील अशी आशा वाटते. शासनाप्रमाणेच जर्मन संग्रहालये आणि जर्मन सरकारतर्फे सहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी विनंती करण्यात आली आहे.