News Flash

मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाचे यकृत दुसऱ्या रुग्णाला

डेक्कनवरील सह्य़ाद्री रुग्णालयात हे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.

दोन वर्षांपूर्वी मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण झालेल्या आणि त्यानंतर नियमित औषधांवर असलेल्या एका महिलेच्या यकृताचे प्रत्यारोपण दुसऱ्या एका रुग्णावर करण्यात आले आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेली महिला घेत असलेली औषधे ‘इम्यूनोसप्रेसिव्ह’ प्रकारची व तिच्या यकृतावर परिणाम करू शकतील अशी होती. परंतु तरीही तिचे यकृत दुसऱ्या रुग्णाला देण्याजोग्या अवस्थेत होते, अशी माहिती हे प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

डेक्कनवरील सह्य़ाद्री रुग्णालयात हे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. व्यवसायाने मुक्त पत्रकार असलेल्या ४२ वर्षांच्या या महिलेवर २०१५ मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले होते. तिच्या आईने तिला मूत्रपिंड देऊ केले होते. त्या शस्त्रक्रियेनंतर या महिलेची प्रकृती चांगली होती. परंतु मधुमेह व उच्च रक्तदाब या आजारांमुळे मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे तिला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. १ जानेवारी २०१७ रोजी तिला ‘मेंदू मृत’ घोषित करण्यात आले. त्यानंतर या महिलेचे यकृत ५४ वर्षांच्या एका पुरुष रुग्णास देण्यात आले. या रुग्णाला ‘क्रॉनिक लिव्हर सिऱ्हॉसिस’ हा आजार होता.

डॉ. बिपीन विभूते यांच्या डॉक्टरांच्या पथकाने हे प्रत्यारोपण केले. ‘आपल्याकडे प्रत्यारोपणासाठीच्या अवयवांची गरज व पुरवठा यात मोठी तफावत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक संभाव्य अवयवदात्याचे अवयव प्रत्यारोपणासाठी घेता येतील का, याचा विचार व्हायला हवा,’ असे डॉ. विभूते यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘या प्रकरणात अवयवदाता असलेली महिला दोन वर्षे ‘इम्यूनोसप्रेसिव्ह’ औषधांवर होती. त्यामुळे त्यांच्या इतर अवयवांवर व यकृतावरही परिणाम झाला असल्याची शक्यता होती. परंतु सर्व चाचण्या केल्यावर हा परिणाम मर्यादेत असून यकृत वापरण्याजोगे असल्याचे लक्षात आले. अशा अवयवांच्या उपयोगाबद्दल माहिती उपलब्ध नसली, तरी या शस्त्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील एका रुग्णास जगण्याची संधी मिळते. यकृताचे प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाची स्थिती उत्तम आहे.’’एकदा प्रत्यारोपित झालेल्या मूत्रपिंडाचे पुन्हा दुसऱ्या रुग्णावर प्रत्यारोपण करता येईल का, असेही संशोधन सुरू असून ते देखील लवकरच घडू शकेल, असेही डॉ. विभूते यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 2:42 am

Web Title: kidney transplant in pune
Next Stories
1 पाळीव प्राण्यांच्या बाजारपेठेवर शासकीय नियमन
2 यंदा पुणे महापालिकेत कमळ फुलले पाहिजे- पूनम महाजन
3 ‘सखे-सोबती’ दूर जाणार!
Just Now!
X