जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर या शनिवारपासून (१४ मार्च) दोन दिवस रसिकांशी सांगीतिक संवाद साधणार आहेत. किशोरी आमोणकर यांच्या गानकर्तृत्वाला अभिवादन करण्याच्या उद्देशातून ‘गानसरस्वती महोत्सवा’चे आयोजन करणाऱ्या नाटय़संपदा प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत किशोरीताईंचे संगीताविषयीचे विचार रसिकांना ऐकण्याची संधी लाभणार असून प्रा. केशव परांजपे या संवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त रघुनंदन पणशीकर यांनी दिली. आयएलएस विधी महाविद्यालयाच्या पंडित हॉल येथे दोन दिवस सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या सुरेल संवादासाठी प्रतिदिन ५० रुपये देणगी प्रवेशिका आहे. ही प्रवेशिका कार्यक्रमाआधी एक तास उपलब्ध होणार आहे.