पिंपरी-चिंचवडमधील एच ए च्या मैदानात भव्य असं भारतीय लष्कराच्या युद्ध सामुग्रीचे प्रदर्शन भरवण्यात आलंय. या ठिकाणी प्रात्यक्षिकांचे सादरीकरणही होणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांचं भारतीय लष्कारावरील असणारे प्रेम दिसून आले. शहरात पहिल्यांदाच भरवण्यात आलेल्या ‘नो यू आर्मी’ उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जवानांच्या स्वाक्षऱ्या घेत त्यांच्यासोबत सेल्फी काढून जवानांना सेलिब्रिटीचा दर्जा दिला. यावेळी विद्यार्थ्यांचे आर्मीबद्दलचे आकर्षण आणि प्रेम पाहून जवानांनी देखील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.

भारतीय लष्कर आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘नो यू आर्मी’ या उपक्रमात शाळकरी विद्यार्थ्यांनी शस्त्रांची माहिती देणाऱ्या जवानांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. चित्रपटात काम करणारे हिरो स्वतःसाठी काम करतात, तर खेळाडू हे देशासाठी खेळतात. मात्र हे जवान देशाची सुरक्षा करतात, त्यामुळे आमचे हेच खरे हिरो आहेत, अशी भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनी जवानांना सेलिब्रिटीचा दर्जा दिला. देशाचं भविष्य असणाऱ्या मुला-मुलींचे लष्कर आणि भारतीय जवानांविषयी असणारे आकर्षण पाहून जवानांचा उत्साह देखील कमालीचा होता.

या उपक्रमामुळे सामान्य जनता आणि जवान यातील अंतर कमी करण्याचा हेतू साध्य होताना दिसतोय. एवढेच नाही तर भारतीय सेना हीच रिअल हिरो असल्याचं चित्र निर्माण होऊन जवानाचं मनोबलही नक्कीच वाढेल. त्यामुळं अशी प्रदर्शन वेळोवेळी आयोजित करणं गरजेचं आहे.