औरंगाबादचे जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून आयुक्तपदाचा कार्यभार ते बुधवारी (२० सप्टेंबर) स्वीकारणार आहेत.
विकास देशमुख यांची विभागीय आयुक्तपदी बदली झाल्यानंतर गेले दोन आठवडे पुण्याच्या आयुक्तपदासाठी वेगवेगळी नावे चर्चेत होती. या काळात अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे प्रभारी आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. कुणाल कुमार हे सध्या औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांची पुणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यासंबंधीचे आदेश मंगळवारी नगर विकास विभागाने काढले.
कुणाल कुमार मूळचे झारखंड राज्यातील रांची येथील आहेत. बीईचे (इलेक्ट्रिकल) शिक्षण पूर्ण करून ते १९९९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. गडचिरोली येथे त्यांची पहिल्यांदा नियुक्ती झाली. त्यानंतर नागपूर येथे ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा येथे जिल्हाधिकारी, नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, जळगावचे जिल्हाधिकारी या पदांवर काम केल्यानंतर सध्या ते औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना त्यांना सिंगापूर येथे प्रशिक्षणासाठीही पाठवण्यात आले होते. ई गव्हर्नन्स बद्दल त्यांनी केलेल्या कामगिरीचा विविध पारितोषिकांनी गौरव करण्यात आला आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून कुणाल कुमार बुधवारी सकाळी पालिकेत येणार असून त्याच वेळी ते पदभार घेतील.