काळ कोणताही असो, त्यासाठी लक्ष्य म्हणून समोर शत्रू असणे गरजेचे असते. मुसलमानांकडे बोट दाखविणे हीच सध्याच्या काळाची आवश्यकता झाली असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. जहिर अली यांनी शुक्रवारी व्यक्त केले. आत्मविश्वासाचा अभाव हेच मुसलमानांच्या मागासलेपणाचे कारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रतिमा प्रकाशन, परिवर्तनाचा वाटसरू आणि युनिक अॅकॅडमीतर्फे प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी लिहिलेल्या ‘भारतीय मुसलमानांची समाजरचना आणि मानसिकता’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जहिर अली यांच्या हस्ते झाले. मुस्लिम ओबीसी चळवळीचे नेते विलास सोनावणे, पसमंदा मुस्लिम महाजचे नेते खालिद अन्सारी, प्रकाशक अरुण पारगावकर या प्रसंगी उपस्थित होते.
डॉ. जहिर अली म्हणाले, धर्माच्या पातळीवर मुसलमान कधीही एक नव्हता आणि तसा तो असणारही नाही. पण, मुसलमान एक आहेत असे भासवून हिंदूू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा आरएसएस परिवाराचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्योत्तर काळात उर्दू ही मुसलमानांची मुख्य भाषा राहिलेली नाही. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे मुसलमानांना जहाल करण्यासाठीचे प्रयत्न मुल्ला-मौलवी यांच्याकडून होत आहेत.
विलास सोनावणे म्हणाले, धर्माच्या नावावर मुसलमानांची गणती करताना जात नावाची गोष्ट कधी दिसलीच नाही.  हिंदूू धर्मातून बाहेर पडले की जात सोडता येते असा गोड गैरसमज फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या वर्गाचाही आहे. मुसलमानांखेरीजच्या समाजाला केवळ बुरखा, तलाक आणि बहुपत्नीत्व याखेरीज फारशी माहिती नाही.
खालिद अन्सारी म्हणाले, हंटर कमिशन ते सच्चर आयोगापर्यंत त्रोटक माहितीच्या आधारे मुसलमानांना मागासले ठरविले गेले हे सत्य नाकारता येणार नाही. तर, केवळ आर्थिकदृष्टय़ा सधन अशा मुस्लिमांचे तुष्टीकरण होत आहे हेदेखील एक वास्तव आहे.
प्रा. फकरूद्दीन बेन्नूर म्हणाले, ८५ टक्के मुसलमान धर्मातरित असून त्यांच्यामध्ये िहदूंपेक्षाही अधिक जातीयता आहे. इतिहासाचे धर्मवादी करणे चुकीचे आहे हेच मी या पुस्तकातून मांडले आहे.