पुणे : पुणे व परिसरात टाळेबंदीचा निर्णय घेतल्यापासून ती लागू होण्याच्या आधीच्या दिवसापर्यंत तब्बल २५ कोटी रुपयांच्या देशी, विदेशी मद्याची विक्री झाली. दरम्यान, टाळेबंदी २३ जुलैपर्यंत असणार असून स्थानिक प्रशासनाने ही टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेतल्यास यापुढील काळातही मद्यविक्री दुकाने बंदच ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, हवेली तालुक्यासह ग्रामीण भागातील काही गावांत टाळेबंदी मंगळवारपासून (१४ जुलै) लागू झाली. ही टाळेबंदी २३ जुलैपर्यंत असणार असून या काळात मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. त्यानंतर परिस्थिती पाहून मद्यविक्री दुकाने पुन्हा सुरू करायची किं वा कसे?, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन मागणी के ल्यानंतर घरपोच मद्य पुरवण्याची सुविधाही बंद राहणार आहे. सोमवारी मद्यविक्रीची दुकाने बंद होईपर्यंत मद्य ग्राहकांनी दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. सोमवारी एकाच दिवसांत चार लाख लिटर मद्याची विक्री झाल्याने तब्बल २० कोटी रुपयांची उलाढाल झाली.

सलग तीन दिवस दुप्पट विक्री

दररोज विदेशी मद्याची एक लाख लिटर, तर देशी मद्याची ८८ हजार लिटर विक्री होते. मात्र, शुक्रवारी दुपारी टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर शनिवार, रविवार आणि सोमवारी दुप्पट मद्यविक्री झाल्याचे निरीक्षण राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदवले आहे. त्या माध्यमातून या तीन दिवसांत २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.