रात्रीच्या वेळी लुबाडणुकीच्या घटना घडणारी ठिकाणी शोधून त्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे. तसेच, निर्मनुष्य ठिकाणी एखाद्या व्यक्तीला लुटले जात असेल तर त्या व्यक्तीला थांबून नागरिकांनी मदत करावी. पोलिसांना घटनेची माहिती तत्काळ द्यावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी.आर. पाटील यांनी केले.
पुण्यात रात्रीच्या वेळी वाहनचालकांना लुटणाऱ्या टोळीचा आलेला अनुभव मांडणारा ऑडिओ सध्या व्हॉट्स अॅपवर मोठय़ा प्रमाणात फिरत आहे. त्यामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबावर ओढवलेला प्रसंग आणि त्यातून त्या कुटुंबाची सुखरूप झालेली सुटका याचे वर्णन करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त शुक्रवारी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. या ऑडिओमधून पुण्यात कमी वर्दळीच्या रस्त्यांवर वाहन चालवणे किती धोकादायक बनले आहे, याची माहिती देण्यात आली आहे. या वृत्ताला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त पाटील यांनी सांगितले, की शहरातील उपनगरातील निर्मुष्य रस्त्यावर असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे जबरी चोरीच्या घटना घडणाऱ्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे. शहरात घडणाऱ्या जबरी चोरीच्या घटना उघडकीस आणण्याचे प्रमाण चांगले आहे. गेल्या सहा महिन्यांत १८६ जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी १३२ घटना उघडकीस आणल्या आहेत. चोरटे हे हेरूनच नागरिकांना लुटतात. नागरिकांनी निर्मुष्य ठिकाणी जाताना काळजी घ्यावी. अंगावरील सोन्याचे दागिने दिसणार नाहीत, याची काळजी घ्यावी. लुटण्याचा प्रयत्न करीत असेल तर आरडाओरडा करून इतरांचे लक्ष वेधून घ्या. तसेच, आपल्यावर वेळ आल्यानंतर बरेचजण जागे होतात. एखाद्या व्यक्तीला निर्मुष्य ठिकाणी कोणी आडविले असेल तर त्याला मदत करा. शक्य झाल्यास मोबाईलमध्ये त्या व्यक्तीचे चित्रीकरण करावे. पोलिसांना घटनेची माहिती तत्काळ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
 यापूर्वीच्या घटनांचा तपास नाही
‘तुमच्या मोटारीने माझ्या मित्राला, नातेवाईकाला धडक दिली आहे. तो गंभीर जखमी असून त्याच्या उपचाराचा खर्च द्या,’ असे म्हणत रात्रीच्या वेळी निर्मनुष्य ठिकाणी अडवून लुबाडण्याची चोरटय़ांची एक पद्धत आहे. पुणे-नगर रस्ता, बंडगार्डन रस्ता आणि पुणे-बंगळुरू बाह्य़वळण महामार्गावर यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. हे गुन्हे गेल्या काही महिन्यांत दाखल झाले आहेत. मात्र, त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही.