• अर्थपूर्ण निरोपाच्या प्रतीक्षेत नगरसेवक
  • शेवटच्या टप्प्यात मतासाठी पाच लाखापर्यंतचा भाव?

राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे चर्चेत आलेली मात्र नंतर दुर्लक्षित झालेली पुणे विधान परिषदेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. हजार-पाचशेच्या नोटा रद्द झाल्यानंतरच्या घडामोडीत तापलेला निवडणुकीचा बाजार पुरता थंडावला आहे. मतांची सौदेबाजी करणारे अर्थपूर्ण निरोप अद्यापही न आल्याने बहुतांश नगरसेवकांमध्ये अस्वस्थता असून ते सूचकपणे नेत्यांकडे विचारणा करताना दिसत आहेत. असे असले तरी शेवटच्या टप्प्यात मतांचा भाव दोन ते पाच लाखापर्यंत जाईल, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक १९ नोव्हेंबरला होत आहे. विद्यमान आमदार अनिल भोसले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. माजी आमदार विलास लांडे यांच्या बंडखोरीने त्यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, लांडे यांच्या माघारीने निवडणुकीची गणिते बदलली. जेमतेम ७०० मतदार असलेल्या या मतदारसंघात निवडणुकीत मतांचा बाजार होण्याची जुनी परंपरा आहे. यंदाही तसे वातावरण निर्माण झाले होते. तथापि, आठ नोव्हेंबरला पाचशे व हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर, चलनकल्लोळ झाल्याने सर्वच क्षेत्रातील परिस्थिती बदलली.

तेच या निवडणुकीच्या बाबतीतही झाले. निवडणुकीच्या सौदेबाजीचा बाजार थंड पडला आहे. या निवडणुकीतून काही तरी मिळेल, अशी अपेक्षा ज्या नगरसेवकांना होती, ते अर्थपूर्ण निरोप येण्याची वाट पाहात होते.

गुरुवापर्यंत तसे झाले नाही, त्यामुळे अनेकांची घालमेल सुरू होती. तथापि, शुक्रवारी आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतांचा बाजार गरम होण्याची दाट शक्यता आहे. शेवटच्या या टप्प्यात दोन ते पाच लाख रुपये असा मताला भाव फुटू शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.