ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपामुळे चर्चेत असणाऱ्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठराखण केली. डीएसके यशस्वी मराठी उद्योजक असून काही राजकीय आणि अमराठी मंडळींनी षडयंत्र करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. डीएसके ३० वर्षांहून आधिक काळ विविध क्षेत्रात काम करत आहेत. ते सर्वात यशस्वी मराठी उद्योजक आहेत. ते सध्या अडचणीमध्ये सापडले असून मुंबई आणि पुण्यातील काही राजकीय आणि अमराठी मंडळी षडयंत्र करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्यक्ती कोण आहेत, याची माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले.

ठेवीदरांची फसवणूक केल्यामुळे सध्या डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने डीएसके यांच्या अटकपूर्व जामिनाला मुदतवाढ दिली होती. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात राज ठाकरे यांनी ठेवीदारांशी संवाद साधून डीएसकेंच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, डीएसके एक महाराष्ट्रीय आणि मराठी व्यावसायिक असल्यामुळे त्यांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे. त्यांच्याच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाच्या मागे उभे राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. डीएसके यांचा व्यवसाय संपूवन अमराठी व्यावसायिकांना पुढे आणण्याचा डाव असून तो कधीही यशस्वी होता कामा नये. यासाठी राजकारण बाजुला सारून मराठी व्यावसायिकाच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. सद्यस्थितीत अनेक बांधकाम व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नोटाबंदीचा अधिक फटका बसल्याने ही परिस्थिती उदभवल्याचे सांगत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.