महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विद्यमान प्रमुख कार्यवाह आणि कोशाध्यक्ष हे दोघेही परस्परांविरोधात एकाच पदासाठी निवडणूक लढवीत असल्याने १५ मार्च रोजी अस्तित्वात येणाऱ्या नव्या कार्यकारिणीमध्ये केवळ एकमेव विद्यमान पदाधिकारी असेल. परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली आहे.
पिंपरी-चिंचवड येथील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कवित्व संपल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पाच वर्षांपासून परिषदेच्या विद्यमान कार्याध्यक्षा आणि गेली तीन वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेल्या डॉ. माधवी वैद्य यांनी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तर, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन हे दोघे पदाधिकारी या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनेलसह निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्य म्हणजे हे दोघेही प्रमुख कार्यवाह या पदासाठी परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे १५ मार्च रोजी नवी कार्यकारिणी अस्तित्वात येईल, तेव्हा विद्यमान कार्यकारिणीतील केवळ एकच पदाधिकारी असेल.
परिषदेच्या वेगवेगळ्या २५ जागांसाठी मिळून ७६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ५ फेब्रुवारी ही मतदारांकडे मतपत्रिका पाठविण्याची अंतिम मुदत असून मतदारांनी या मतपत्रिका १४ मार्चपर्यंत पोहोचतील, अशा बेताने पाठवावयाच्या आहेत. १५ मार्च रोजी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांनी दिली. स्थानिक कार्यवाह म्हणून दोन पदे आणि जिल्हा प्रतिनिधी म्हणून सहा पदांवरचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढलेले श्रीनिवास वारुंजीकर हे आता सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून आपले नशीब आजमावत आहेत. तर, परिषदेच्या कार्याध्यक्षपदासाठी पूर्वीपासूनच मोर्चेबांधणी करणारे प्रमोद आडकर हे स्थानिक कार्यवाह या पदासाठी रिंगणात आहेत.
परिषदेच्या कार्याध्यक्षपदासाठी राजीव बर्वे आणि प्रा. मििलद जोशी यांच्यामध्ये तर, कोशाध्यक्षपदासाठी योगेश सोमण आणि सुनीताराजे पवार यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. स्थानिक कार्यवाह सहा पदे असून माधव राजगुरू आणि वि. दा. िपगळे हे दोघे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले असल्याने चार जागांसाठी लढत होत आहे. दीपक करंदीकर विरुद्ध ज्योत्स्ना चांदगुडे, नीलिमा बोरवणकर विरुद्ध बंडा जोशी, स्वप्नील पोरे विरुद्ध उद्धव कानडे आणि घन:श्याम पाटील विरुद्ध प्रमोद आडकर अशी निवडणूक होणार आहे.