राज्य शासनाने लागू केलेल्या एलबीटीच्या (स्थानिक संस्था कर) विरोधात व्यापाऱ्यांनी पुन्हा बंद पुकारण्याचा पवित्रा घेतल्यानंतर नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून पालिका व पोलीस प्रशासन एकत्र आले आहेत. संभाव्य बंद काळात शहरातील सर्व १८ मॉल सुरू राहावेत व त्या ठिकाणी दूध व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मॉलचालकांना पोलीस व महापालिकेकडून संरक्षण दिले जाणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी व पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या उपस्थितीत पालिका मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यात शहरातील मोर, डी मार्ट, बिग बझार, स्टार बझार आदी मॉलचे मालक-चालक उपस्थित होते. या वेळी परदेशी व उमाप यांनी मॉलचालकांना बंद काळात मॉल सुरू ठेवण्याचे आवाहन केले. त्यास सर्वानी सकारात्मक प्रतिसाद दिला. पोलिसांकडून पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही उमाप यांनी दिली. याबाबतची माहिती आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी एलबीटी विभागाचे प्रमुख अशोक मुंढे उपस्थित होते.
आयुक्त म्हणाले, २२ एप्रिलपासून व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्यास शहरातील मॉल सुरू राहतील, नेहमीपेक्षा लवकर उघडून ते उशिरा बंद करण्यात येतील. त्यात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातील. पोलिसांप्रमाणेच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी चालकांच्या मदतीला असणार आहेत. कोणतीही अडचण असल्यास नागरिकांनी ती पोलीस तसेच मुंढे यांच्याकडे मांडावी. एलबीटी हा प्रवेशकर आहे, त्याविषयी गैरसमज तसेच दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला होता. आता तसे चित्र नाही. याबाबतची पुरेशी माहिती व्यापाऱ्यांना झालेली आहे. कोणत्याही परिस्थितीत एलबीटी रद्द होणार नाही. मुंढे म्हणाले, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित ठेवता येणार नाही. चढय़ा भावाने मालाची विक्री करता येणार नाही. बंद काळात रेशन दुकान सुरूच राहणार आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.