पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आज (मंगळवार) दुपारी अडीचच्या सुमारास विश्वेश्वर चौकात झालेल्या अपघातातील मृताचे नाव तुकाराम आप्पा मेस्त्री असे आहे. वाहनाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तुकाराम मेस्त्री हे विश्वेश्वर चौकातील कंपनीत कामाला होते. दुपारच्या वेळी ते कंपनीच्या बाहेर चहा पिण्यासाठी आले होते. मात्र, रस्ता ओलांडत असताना त्यांना भरधाव असणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यात मेस्त्री हे गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसी पोलिसांत अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.