नऊवारी साडी नेसून दागदागिने घालून फुगडय़ा, झिम्मा, गोफ, किकीच असे मंगळागौरीचे खेळ खेळणाऱ्या काही शालेय मुलींना बघितले की थक्क व्हायला होते. मंगळागौरीचे एकशेएक खेळ शिकण्याची जिद्द आणि त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा याबरोबरच त्यांच्या शिक्षणाला मिळते आर्थिक बळ.
श्रावण महिन्यातील या खेळांमुळे त्यांच्यात स्मार्टपणा तर आलाच, पण त्याबरोबरच शरीराची लवचिकता आणि मानसिक ताकदही वाढली. या सगळ्या मुली आहेत निरामय संस्थेच्या. किशोरी शक्ती प्रकल्पांतर्गत एकत्र जमणाऱ्या शालेय विद्यार्थिनी. तीन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात या मुलींना मंगळागौरीच्या खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले गेले आणि त्यांना हे खेळ खूप आवडले. त्यामुळे त्यांनी हे खेळ शिकण्याचा निश्चय केला आणि सुरू झाली एका आश्वासक वाटेवरची त्यांची वाटचाल. संस्थेतील पर्यवेक्षिका राणी थोपटे यांनी देखील या मुलींच्या इच्छेला प्रोत्साहन दिले आणि क्षितिजा आगाशे यांच्याबरोबरच वर्षां कोंडेजकर, देवयानी पाटणकर यांनी महिनाभर या पस्तीस मुलींना या खेळांचे प्रशिक्षण दिले. पाचवी ते बारावीमधील या मुली पुण्याच्या विविध भागांमध्ये आपल्या खेळांचे सादरीकरण करतात. काही स्पर्धामधून रंगमंचीय सादरीकरणासाठी देखील त्यांना संधी आणि व्यासपीठ दोन्हीही उपलब्ध झाले आहे. या प्रशिक्षणानंतर या मंगळागौरीच्या खेळांचे सादरीकरण विविध ठिकाणी करायचे, जेणेकरून या मुलींच्या शिक्षणाला आर्थिक पाठबळ मिळेल.
आपल्या शिक्षणातील खर्चाचा बराचसा भाग या खेळातून मिळू लागला, तससशी त्यांचीही उमेद वाढत गेली. तत्पूर्वी मुलींच्या पालकांना विश्वासात घेणे, त्यांना मंगळागौरीच्या खेळांची ओळख करून देणे, त्यांचे काही गैरसमज असतील तर ते दूर करणे, मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी असे अनेक प्रश्न होते. पण या प्रश्नांना हातावेगळे करीत या मुलींची मोट बांधून सतत सरावातून या मुली ठिकठिकाणी मंगळागौरीचे खेळ खेळू लागल्या. यामध्ये निरामय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे देखील अनमोल सहकार्य लाभले.
स्त्री शिक्षण, प्रदूषण, पाणीप्रश्न, साक्षरता, आरोग्य, व्यसनाधीनता, स्त्री-पुरुष समानता, लोकसंख्या, स्त्री भ्रूणहत्या असे अनेक सामाजिक संदेश देणारी गाणी या मंगळागौरीच्या खेळात बसवून घेण्यात आली आहेत, त्यांना विशेषत्वाने दाद मिळते. या वस्तीविभागातील मुलींना या खेळांबरोबरच सातत्याने समुपदेशन, आचार विचार याविषयी, परंपरा या विषयी देखील मार्गदर्शनांची गरज होती, या सगळ्या गोष्टींकडे राणी थोपटे यांनी जाणीवपूर्वक लक्ष ठेवले. त्यातून या मुलींचा आत्मविश्वासही वाढत गेला आणि समाजात
स्वत:ची नवी ओळख तसेच समाजाची देखील वेगळी ओळख या मुलींना झाली आहे.