विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून व्यावसायिक शिक्षणातील पदवी अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सुरू केले. विद्यापीठ आणि फग्र्युसन महाविद्यालयाने गाजावाजा करत ‘मीडिया अँड कम्युनिकेशन’ या विषयांत बी. व्होक हा अभ्यासक्रम सुरूही केला. मात्र, हा अभ्यासक्रम म्हणजे फक्त गोंधळच असल्याचे समोर येत आहे. गेले आठ महिने वेळापत्रक, अभ्यासक्रम, शिक्षक, तासिका यातील काहीच झाले नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी लढा उभारला आहे.
विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुख प्रशिक्षण मिळावे म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने बी.व्होक या नव्या पदवी अभ्यासक्रमाची आखणी केली. हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांना अनुदानही देण्यात आले. त्यानुसार फग्र्युसन महाविद्यालयात ‘मीडिया अँड कम्युनिकेशन’ या विषयातील बी.व्होक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसादही मिळाला. प्रवेश क्षमतेपेक्षाही जास्त गर्दी या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी केली. परदेशी विद्यार्थ्यांनीही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. एका वर्षांचे साधारण पंधरा हजार रुपये शुल्क भरून उत्साहाने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच आली. गेल्या आठ महिन्यांत महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना निश्चित अभ्यासक्रम आराखडा, वेळापत्रक दिले नाही. महाविद्यालयाकडे या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली सामग्री, पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इतर संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवले जाते. पहिल्या सत्रात फक्त एकच तास होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दुसरे सत्र सुरू होऊन एक महिना उलटून गेला तरीही विद्यार्थ्यांचे नियमित तास सुरू झालेले नाहीत. सुरूवातीला दिलेले विषय, अभ्यासक्रम यांतही आयत्यावेळी बदल करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आता सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून संस्था आणि विद्यापीठाशी लढाई सुरू केली आहे.
‘महाविद्यालयाने आमचे आठ महिने फुकट घालवले. अभ्यासक्रम सुरू होण्यापूर्वी जे सांगण्यात आले होते, त्याप्रमाणे कोणतेही तास झाले नाहीत. याविषयी महाविद्यालयाकडे वारंवार तक्रार करूनही परिस्थिती बदलली नाही. प्रत्येक वेळी महाविद्यालय विद्यापीठाकडे बोट दाखवते. पंधरा दिवसांत, महिन्यांभरात सगळ्या अडचणी सोडवू असे आश्वासन देते. मात्र, प्रत्यक्षात काहीच घडत नाही. त्यामुळे आता सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आम्ही आमचे म्हणणे मांडलेच आहे. कुलगुरू, संस्था, प्राचार्य या सगळ्यांना एक पत्र लिहिले आहे.’ याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांची भेट घेतली असून शुक्रवारी प्राचार्य, विद्यापीठाचे अधिकारी आणि विद्यार्थी यांची एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे.

‘‘आम्ही ९४ पासून व्यवसाय अभ्यासक्रम चालवतो. बी.व्होक यावर्षीच सुरू झाले असले तरी फिल्म स्टडीज, फोटोग्राफी असे अभ्यासक्रम डेक्कन एज्युकेशन सोसायटीत पूर्वीपासून आहेत. त्यामुळे आमच्याकडे आवश्यक त्या सुविधा आहेत. अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. मात्र, विद्यापीठाच्या सूचनेनुसारच आठ ऐवजी सहा विषय करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी आहेत. मात्र, त्याबाबत विद्यार्थी आणि पालकांशी बोलणे झाले असून लवकरच त्या तक्रारी सोडवण्यात येतील.’’
डॉ. रवींद्र परदेशी, प्राचार्य, फग्र्युसन महाविद्यालय

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !