काही ठिकाणी अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

पुणे : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भागांत रविवारपासून पाऊस आणखी जोर धरण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांत प्रामुख्याने पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर राहणार आहे. विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांत प्रमुख्याने घाट विभागांत तुरळक टिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि मराठवाड्याच्या परिसरात असलेली वाऱ्यांची चक्रीय स्थिती यामुळे ७ सप्टेंबरला मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात विविध ठिकाणी धुवाधार पावसाने तडाखा दिला. काही भागांत पुराचे पाणी शिरून शेतीचे नुकसान झाले. मराठवाडा आणि विदर्भात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून, हे क्षेत्र तीव्र होऊन पश्चिाम-उत्तर दिशेने सरकणार आहे. त्याचप्रमाणे सध्या ईशान्य अरबी समुद्रापासून गुजरातपर्यंतच्या किनारपट्टीपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण विभागात पाऊस कायम राहणार असून, १२ सप्टेंबरपासून काही भागांत त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे १३, १४ सप्टेंबरला किनारपट्टीलगतच्या भागात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. १३ सप्टेंबरला कोकण विभाग आणि पश्चिाम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होणार असून, विदर्भातही पुढील तीन ते चार दिवस काही भागांत मुसळधारांचा अंदाज आहे.

पाऊसभान…

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात सर्वच ठिकाणी १५ सप्टेंबरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांत १३ ते १५ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतही पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस असेल. मुंबईतही १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढेल. १३ सप्टेंबरला रायगड, तर १४ सप्टेंबरला पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत या जिल्ह्यांतील घाट विभागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असून, पुणे जिल्ह्यांतील घाट विभागात तुरळक ठिकाणी १३ सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.