पुणे शहरात बहुचर्चित ठरलेल्या मेट्रो प्रकल्पाबाबतच्या हरकती-सूचनांवरील सुनावणी गुरुवारी (१६ ऑक्टोबर) सुरू होत असून मेट्रोसाठी करण्यात आलेल्या विविध तरतुदींबाबत साडेचार हजार पुणेकरांनी हरकती नोंदवल्या आहेत. या सर्वाना सुनावणीसाठी बोलावले जाणार आहे. तशी पत्र नगर अभियंता कार्यालयातून हरकती दाखल केलेल्या नागरिकांना पाठवण्यात आली आहेत.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या नियोजित मार्गापासून दोन्ही बाजूंना पाचशे मीटर अंतरापर्यंत मेट्रो प्रभावित क्षेत्रात ज्या मिळकती आहेत त्यांचे विकसन या पुढील काळात कशा पद्धतीने करावे यासंबंधीचे नवे नियम प्रस्तावित करण्यात आले आहेत. हे नियम विकास नियंत्रण नियमावलीत प्रस्तावित करण्याची कार्यवाही केली जाणार असून त्यासाठी नागरिकांकडून हरकती-सूचना मागवण्यात आल्या होत्या. या आवाहनानंतर तब्बल साडेचार हजार पुणेकरांनी हरकती नोंदवल्या.
हरकती-सूचनांची मुदत ऑगस्टमध्येच संपली होती. मात्र, नागरिकांच्या मागणीमुळे या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. आलेल्या सर्व हरकतींवरील सुनावणी गुरुवारपासून सुरू होत असून तशी पत्र नागरिकांना पाठवण्यात आली आहेत.