मद्यधुंद अवस्थेत भरधाव ट्रक चालविणाऱ्या चालकाने शुक्रवारी मध्यरात्री हडपसर ते शिवाजी रस्त्यापर्यंत दहा ते बारा वाहनांना धडक देत अक्षरश: धुमाकूळ घातला. या प्रकारात तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. एका मोटार चालकाने या ट्रकचा पाठलाग करून पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर शिवाजी रस्त्यावरील रामेश्वर चौकामध्ये पोलिसांनी हा ट्रक अडविला व ट्रकचालकाला अटक केली.
जितेंद्र बसाई सिंग (वय ४१, रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे या ट्रकचालकाचे नाव आहे. या प्रकरणी अमोल अभिमान पारडे (वय २५, रा. समता कॉलनी, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. सिंग हा गुजरात येथून साहित्य घेऊन पुण्यात आला होता. त्याने मोठय़ा प्रमाणावर मद्यपान केले होते. हडपसर येथील गाडीतळ येथे रात्री साडेअकराच्या सुमारास त्याने पारडे यांच्या मोटारीला पाठीमागून व नंतर बाजूने धडक दिली. त्यानंतर पुढे जातानाही तो इतर वाहनांना धडका देत होता. त्यामुळे पारडे यांनी या ट्रकचा पाठलाग सुरू केला. त्याबरोबरच या ट्रकची माहिती त्यांनी पोलिसांनाही दिली.
गाडीतळ येथून हा ट्रक येरवडय़ाच्या दिशेने वळला. त्यानंतर कोरेगाव पार्कमार्गे तो शिवाजी रस्त्याकडे निघाला. शिवाजी रस्त्यावरही ट्रकने काही वाहनांना धडक दिली. पोलिसांना या ट्रकची माहिती मिळाली असल्याने पोलीस निरीक्षक एल. बी. कांबळे, कर्मचारी राजेश शिंदे, ओंकार शिंदे, संतोष अनुसे, अनिल रासकर यांनी लाल महाल येथून या ट्रकचा पाठलाग सुरू केला. पोलीस वाहने अडवी घालून मोठय़ा प्रयत्नानंतर रामेश्वर चौकामध्ये पोलिसांनी ट्रक अडवला. त्यावेळी संतप्त नागरिकांनी ट्रकचालकाला चोपही दिला. संतप्त जमावातून त्याला बाहेर काढून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ट्रकचालक सिंग याने मोठय़ा प्रमाणावर दारू प्यायली असल्याने त्याला व्यवस्थित बोलताही येत नव्हते. त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.