मुंबई, पुणे, सोलापूर, धुळ्यातून मदत

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्य़ांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे तब्बल दोन लाख पाच हजार ५९१ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सर्वाधिक फटका कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ांना बसला असून तेथे मुंबई, पुणे आणि धुळे जिल्ह्य़ांतून मदत पाठवण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे अन्नपदार्थ पुरवण्यात येत आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ांमध्ये पुरात ५३ हजार नागरिक सापडले आहेत. या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स – एनडीआरएफ) प्रादेशिक सेना (टेरिओरियल आर्मी) आणि नौदलाच्या पथकांबरोबरच एक हेलिकॉप्टर कार्यरत असून मुंबईहून दोन हेलिकॉप्टर मागवण्यात आली आहेत. कोल्हापुरातील पाणी पातळी कमी होत आहे. मात्र, सांगलीत पाणी पातळी वाढली आहे. सांगलीत सध्या ३० ते ३५ हजार, तर कोल्हापुरात १७ ते १८ हजार नागरिक सापडले आहेत.

कोल्हापुरातील ९७ हजार १०२, सांगलीतील ८० हजार ३१९, तर पुण्यातील १३ हजार ३३६ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. विभागातील ५८ तालुक्यांपैकी ३७ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमधील सर्व धरणे १०० टक्के भरली आहेत. सांगली जिल्ह्य़ात एनडीआरएफची आठ पथके, १९० जवान आणि २६ बोटींद्वारे नागरिकांना मदत करण्यात येत आहे.

पुण्यातून एनडीआरएफची तीन पथके आणि दोन राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) पथके पाठवण्यात आली आहेत. मुंबईतून तीन, सातारा आणि धुळ्यातून एनडीआरएफचे प्रत्येकी एक पथक सांगलीत पाठवण्यात आले आहे. प्रादेशिक सेनेचे एक पथक असून त्यामध्ये ५४ जवान आणि बोटी कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाकडूनही ११ पथके काम करत असून त्यामध्ये ५४ कर्मचारी आणि १२ बोटी आहेत.

सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून २० बोटी सांगलीसाठी रवाना झाल्या आहेत, तर कोल्हापूरमध्ये एनडीआरएफची सात पथके असून त्यामध्ये १४० जवान आणि २० बोटी आहेत. प्रादेशिक सेनेची चार पथके आणि नौदलाची १४ पथके आणि १६ बोटी आहेत. जिल्हा प्रशासनाची २१ पथके कार्यरत असून त्यामध्ये १२७ कर्मचारी आणि २३ बोटी आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाकडून गुरुवारी देण्यात आली.

मुंबई-बेंगळुरू रस्ता बंदच

कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाल्याने बंद असलेला मुंबई- बेंगळुरू रस्ता शुक्रवारी (९ ऑगस्ट) सुरू होण्याची शक्यता कमी आहे. सांगलीतील सहा प्रमुख राज्यमार्ग, २१ जिल्हामार्ग पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापुरात २९ राज्यमार्ग आणि ५७ जिल्हामार्ग बंद आहेत. साताऱ्यातील आठ पूल पाण्याखाली असून पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असून त्यानुसार या धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे.