जलकेंद्रातील पाणी खासगी पाणीविक्री प्रकल्पांमध्ये

महापालिकेच्या जलकेंद्रातील पाणी टँकरद्वारे खासगी सोसायटय़ांना विकण्याचे प्रकार घडत असतानाच आता जलकेंद्रातील पाणी ठेकेदार स्वत:च्या बाटलीबंद पाणी विक्रीच्या प्रकल्पांना पोहोचवत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एका केंद्रातून दिवसाला अशा प्रकारे तब्बल १५ ते २० टँकरद्वारे दीड ते दोन लाख लिटर पाण्याची चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. महापालिकेचे पाणी स्वत:च्या बाटलीबंद व्यवसायाच्या प्रकल्पाला मिळावे यासाठीच ठेकेदारांकडून जाणीवपूर्वक कमी दराने निविदा भरण्यात येत असून जलकेंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा उद्योग राजरोसपणे सुरु आहे.

शहराच्या काही भागात अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे त्या-त्या भागातील गृहप्रकल्प, इमारती आणि सोसायटय़ांना त्यांच्या मागणीप्रमाणे महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी निविदा प्रक्रिया करुन ठेका देण्यात येतो. महापालिकेच्या जलकेंद्रातून पाण्याची चोरी होत असल्याच्या आणि ठेकेदाराकडून मोठय़ा सोसायटय़ांना चढय़ा दराने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात आहेत. मात्र हा प्रकार एवढय़ापुरताच मर्यादित राहिला नसून कमी किमतीमध्ये पाणी घेऊन ठेकेदार स्वत:च्या मालकीच्या वॉटर प्लॅन्टमध्ये हे पाणी नेत असल्याचे, तसेच बांधकाम प्रकल्पांना हे पाणी दिले जात असल्याचे पुरावे ‘लोकसत्ता’च्या हाती लागले  आहेत. येरवडा आणि वडगांवशेरी या दोन जलकेंद्रातील ही परिस्थिती पुढे आली आहे. जलकेंद्रातील टँकरची चलने ‘लोकसत्ता’ला मिळाली असून नियोजित ठिकाणी न जाता या टँकरची विक्री परस्पर खासगी शैक्षणिक संस्थांना तसेच बांधकाम प्रकल्पांना आणि बाटलीबंद पाणी प्रकल्पांना केली जात आहे.

महापालिकेकडून सोसायटय़ांना पाणीपुरवठा करण्याचा ठेका घेतल्यानंतर ठेकेदाराकडून तीन महिन्यात १२५० टँकरच्या खेपा होणे अपेक्षित असते. एक टँकर १० हजार लिटर क्षमतेचा असणे आणि टँकरचे क्रमांक महापालिकेला देणे बंधनकारक आहे. तसेच टँकरवर जीपीएस प्रणाली बसविणेही आवश्यक आहे. मात्र या नियमांना फाटा देत ठेका मिळविला जातो. जलकेंद्रातून पाणी मिळविण्यासाठी जाणीवपूर्वक कमी दराने निविदा भरल्या जातात. या निविदा किमान ५० ते ६० टक्के कमी दराने भरल्या जातात. वास्तविक महापालिकेचा दहा हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकर ठेकेदारांना चारशे रुपयांच्या आसपास पडतो. ही बाब लक्षात घेऊन दररोज या दोन केंद्रातून एकूण सव्वा ते दीड लाख लीटर पाणी बाटलीबंद पाण्याच्या प्लँटमध्ये पोहोचविण्यात येते आणि त्या पाण्याची विक्री करण्यात येते, असे आढळून आले. विशेष म्हणजे काही टँकरची चलनेही काढण्यात येत नाहीत.

असा पुढे आला प्रकार

येरवडा जलकेंद्रातून टँकर क्रमांक एमएच-१२-एचडी ६३७१ चे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चलन काढण्यात आले. नियमाप्रमाणे डीएस गिरी सोसायटीत  हा टँकर जाणे अपेक्षित होते. मात्र त्या ठिकाणी न जाता तो ठेकेदाराच्या स्वत:च्या साईटवर गेला. तसेच तो विमाननगर येथील एका महाविद्यालयात मोकळा करण्यात आला. याच जलकेंद्रातून हाच टँकर दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास चलन न काढता विमाननगर येथील एका बांधकाम प्रकल्पावर मोकळा करण्यात आला.

वडगांवशेरी पाणी भरणा केंद्रातून एमएच -१२ एचडी ६२७३ हा टँकर चलनानुसार मनपा शाळेत जाणे अपेक्षित होते. मात्र तो एका खासगी वॉटर फिल्टर प्लॅन्टला पोहोचला. याच केंद्रातून टँकर क्रमांक एमएच-१२-एचडी-६३७८ वडगांवशेरी येथील घरोंदा सोसायटीकडे निघाला. प्रत्यक्षात तोही एका बाटलीबंद पाणी प्रकल्पात पोहोचला. त्यामुळे ठेकेदार स्वत:च्या पाणी प्रकल्पाला पाणी पोहोचवित असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे या जलकेंद्रांची पाहणी केल्यानंतर टँकरना जीपीएस प्रणाली नसल्याचे आणि जलकेंद्रातील सीसीटीव्ही बंद ठेवल्याचेही आढळून आले.

जलकेंद्रातील पाण्याची चोरी होऊ नये यासाठी निविदा प्रक्रियेत कोणी सहभागी व्हावे, याचे काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार ज्यांचा स्वत:चा बाटलीबंद पाणी वा शुद्धीकरणाचा प्रकल्प आहे अशांनी टँकरच्या निविदा भरू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही फिल्टर प्लॅन्ट असलेले ठेकेदार ठेका घेत असून स्वत:चा आर्थिक फायदा करीत आहेत.