मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या कुंचल्यातून साकारलेली व्यंगचित्रे लवकरच फेसबुकवर पाहायला मिळणार आहेत. पुण्यातील बाल गंधर्व कलादालनात चित्रकार घनश्याम देशमुख यांच्या बोलक्या रेषा या हास्यचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

आपल्या देशात संगीत संस्कृती आहे. त्या तुलनेत व्यंगचित्रकला संस्कृती अद्याप रुजलेली नाही. आपण केवळ व्यंगचित्र पाहतो, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राज्यात आणि देशात अनेक नामवंत व्यंगचित्रकार होऊन गेले. त्यातील काही व्यंगचित्रकारांची नावे रस्ते आणि चौकांना देण्यात आली. मात्र, त्यांच्याविषयी माहिती आताच्या पिढीला शालेय जीवनापासून होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. दररोज वर्तमानपत्रे वाचताना माझे हात शिवशिवायला लागतात. पण व्यासपीठ नाही. लवकरच माझ्या फेसबूक पेजवर मी साकारलेली राजकीय व्यंगचित्रे पाहायला मिळतील, अशी माहितीही ठाकरे यांनी यावेळी दिली.