मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची ओढ कायम

राज्यात मोसमी पावसासाठी पोषक स्थिती तयार होत नसल्याने मागील तीन आठवडय़ांपासून राज्याच्या अनेक भागांत जोरदार पावसाऐवजी तुरळक सरींवरच समाधान मानावे लागत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची ओढ कायम आहे. त्यामुळे या भागाला आता परतीच्या पावसावर अवलंबून राहावे लागणार असल्याचे चित्र असून, त्यादृष्टीने हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

राज्यामध्ये जून महिन्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवडय़ामध्ये पावसाचा खंड पडला होता. त्यानंतर चांगल्या पावसाला सुरुवात झाली होती. काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची नोंदही झाली. त्यानंतर जुलैपासून पुन्हा पावसाने दडी मारली. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र नाहीसे झाल्यानंतर जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ापासून राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावलेली नाही. मागील वर्षीही जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये सुमारे सहा आठवडे पावसाने ओढ दिली होती.

सद्य:स्थितीत दक्षिण मध्य भारतामध्ये मोसमी पाऊस सक्रिय होण्यासाठी फारशी अनुकूल स्थिती नसल्याने पावसाची ओढ कायम आहे. मात्र, पुढील आठवडाभर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, पुढील आठवडय़ात देशाच्या उत्तर भागात मोसमी पाऊस अधिक सक्रिय राहणार आहे. उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन उत्तरेकडील राज्यांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.