करोना विषाणू संसर्गामुळे शाळा आणि शैक्षणिक कामकाज ठप्प असताना राज्यभरातील सुमारे ७० हजारांहून शिक्षक करोनाविरुद्धच्या लढय़ात योगदान देत आहेत. संसर्गाचा धोका पत्करून शिक्षक स्वसंरक्षण साहित्य संच (पीपीई किट) वाटप, सर्वेक्षण अशा कामांची जबाबदारी निभावत आहेत.

राज्यात दिवसेंदिवस करोना विषाणू बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे.

त्यामुळे विविध प्रकारची कामे करण्यासाठी शिक्षकांची मदत घेण्यात येत आहे. राज्यभरातील करोनाबाधित जिल्ह्य़ांमध्ये शिक्षक काम करत आहेत.

एकीकडे काही शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधून अध्यापनाचे काम करत आहेत, तर सुमारे वीस हजार शिक्षक करोनाविरुद्धच्या लढय़ात प्रत्यक्ष कार्यरत आहेत. त्यात जिल्हा परिषद शाळा, महापालिका, खासगी शाळांतील पुरुष आणि महिला शिक्षकांचा समावेश आहे.

एकीकडे जनगणना, निवडणूक अशी अशैक्षणिक कामे करणारे शिक्षक सध्याच्या अवघड काळातही मागे नाहीत. संसर्गाचा धोका पत्करून शिक्षक प्रशासनाला हातभार लावत आहेत. प्राथमिक विभागातील सुमारे ५७ हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.

या कार्यात माध्यमिक विभागातील १५ हजार शिक्षकांचा समावेश असल्याचे माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले. दोन्ही संचालनालयाकडून करोना काळात प्रत्यक्ष काम करत असलेल्या शिक्षकांची माहिती संकलित करण्यात आली आहे. तपासणी नाके , स्वस्त धान्य दुकाने, निवारागृहे, विलगीकरणासाठीच्या शाळा या ठिकाणी लक्ष ठेवण्यासह स्वसंरक्षण साहित्य संच वाटप, आजारी नागरिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण अशा कामांची जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आली आहे.

अधिकारी, लिपिकही सक्रिय

राज्यभरातील शिक्षकांसह केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, लिपिक या घटकांचाही करोना विरुद्धच्या लढय़ात सहभाग आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राकडून करोना संसर्ग रोखण्याच्या कामी व्यापक योगदान दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सांगलीजवळ गस्ती पथकातील शिक्षकाला ट्रकने चिरडले 

सांगली : शिक्षकांना नाकाबंदी करण्याच्या कामावर जुंपण्याच्या प्रकाराबद्दल राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच या नाकाबंदीवेळी चौकशीसाठी अडवणूक करणाऱ्या गस्ती पथकातील एका शिक्षकाला ट्रकखाली चिरडून मारण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटे जत तालुक्यातील डफळापूर येथे घडला.

विजापूरहून शिंगणापूर माग्रे डफळापूरला येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने शिक्षक नानासाहेब कोरे (वय ३६) हे जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असलेले मदतनीस संजय चौगुले (वय २५) हे जखमी झाले. याप्रकरणी ट्रकचालक हणमंत मुरड (वय ३५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावपातळीवर बंदोबस्त आणि नाकाबंदीसाठी गावपातळीवरील शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पथक तनात करण्यात आले आहे. डफळापूर येथील शिंगणापूर मार्गावर हे पथक कार्यरत होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अथणीहून सिमेंट घेऊन येणारा ट्रक अडविण्याचा प्रयत्न गस्ती पथकाने केला.

ट्रकमधून प्रवाशांची वाहतूक होत आहे का हे पाहण्यासाठी ट्रकला थांबण्याचा इशारा केला. मात्र तपासणी पथकाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून ट्रक तसाच पुढे नेण्यात आला.

या वेळी शिक्षक कोरे आणि चौगुले यांनी दुचाकीवरून पाठलाग करीत ट्रकच्या पुढे जाऊन ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रक तसाच त्यांच्या अंगावरून नेला.