७८ इमारती, ९५ गृहनिर्माण संस्था प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर

पुणे : शहरात फे ब्रुवारीच्या सुरुवातीपासून करोना संसर्गाने पुन्हा डोके  वर काढले आहे. शहरातील गृहनिर्माण सोसायटय़ांमध्येच करोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर के लेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या गुरुवापर्यंत (२५ मार्च) शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या २०६ एवढी झाली आहे. त्यामध्ये ७८ इमारती आणि ९५ गृहनिर्माण संस्था, तर ३३ छोटे परिसर यांचा समावेश आहे.

शहरात करोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, अनेक रुग्णांमध्ये लक्षणे आढळून येत नसल्याने संबंधितांचे गृह विलगीकरण करण्यावर भर दिला जात आहे. महापालिके ने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत इमारत, सोसायटी आणि छोटा परिसर असे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित के ले आहेत. चार किं वा पाच इमारती असणाऱ्या एखाद्या गृहनिर्माण संस्था आणि छोटय़ा परिसरात २० पेक्षा जास्त रुग्ण निदर्शनास आल्यास संबंधित सोसायटी किं वा छोटा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. एखाद्या इमारतीमध्ये पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास ती इमारत सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत आहे. इमारती किं वा सोसायटीमध्ये विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारण्यात येत असून प्रवेशद्वारावर प्रतिबंधित क्षेत्राबाबत माहिती लिहिली जात आहे. रुग्णांना या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातून आत-बाहेर करण्यास मनाई करण्यात आली असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई के ली जात आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असल्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येतही बदल होत आहेत, असे महापालिके कडून सांगण्यात आले.

दरम्यान, शहरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५३ दिवस एवढा आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.३८ टक्के  असून मृत्युदर २.०७ टक्के  एवढा आहे. २५ मार्चपर्यंत गृह विलगीकरणात २४ हजार ६९८ रुग्ण असून, शासकीय रुग्णालयांमध्ये १०५८, तर खासगी रुग्णालयांत २३६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, करोना काळजी के ंद्रांमध्ये २०७ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत कुटुंबे बाधित होण्याच्या प्रमाणात वाढ

पुणे : फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या करोना रुग्णसंख्येच्या वाढीने शहरात दुसऱ्या लाटेचे स्वरूप धारण के ले आहे. या लाटेत संपूर्ण कु टुंबेच बाधित होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना खबरदारी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

पुणे शहरात दुसऱ्या लाटेने हातपाय पसरण्यास सुरुवात के ल्यानंतर मोठय़ा प्रमाणात कु टुंबांना एकत्रित संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रुग्णांना गृह विलगीकरण हवे असल्यास त्याची अंमलबजावणीही कठोर असण्याची गरज डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. गृह विलगीकरणाचे नियम कटाक्षाने पाळण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुग्णाकडून घेतले जाते. रुग्ण राहत असलेल्या परिसरातील विभागीय आणि प्रभागस्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे रुग्णाची नोंद असणे आवश्यक आहे. प्रकृतीत कोणत्याही प्रकारचे चढउतार, प्रामुख्याने श्वास घेण्यास त्रास आढळल्यास त्याची माहिती या अधिकाऱ्यांना कळवणेही रुग्णांसाठी बंधनकारक आहे.

पुणे महापालिके चे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, नेमकी संख्या नोंदवलेली नाही मात्र संपूर्ण कु टुंबे बाधित आढळण्याचे प्रमाण मागील वर्षीपेक्षा अधिक आहे. विषाणूच्या संसर्गाचा वेग वाढला आहे हे यामागील एक प्रमुख कारण आहे, तसेच गृह विलगीकरणाची अंमलबजावणी कटाक्षाने होत नाही, असा निष्कर्षही यातून निघतो. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून गृह विलगीकरण रुग्ण आणि त्याच्या कु टुंबाकडून काटेकोरपणे पाळले जाणे महत्त्वाचे आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे साथरोग तज्ज्ञ डॉ. अतुल मुळे म्हणाले, मागील वर्षीही कु टुंबातील एक किं वा दोन सदस्यांना संसर्ग होत असे, मात्र या वेळी संपूर्ण कु टुंब बाधित आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. तरुण वयाच्या, सहव्याधी नसलेल्या रुग्णांनी योग्य औषधे, आहार आणि विश्रांती घेतल्यास आजार बळावण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे त्यांचे गृह विलगीकरण करणे सोयीचे ठरते, मात्र नियम काटेकोरपणे पाळणे महत्त्वाचे असते.

गृह विलगीकरण कुणासाठी?

’ रुग्णाची लक्षणे सौम्य किं वा मध्यम असावीत.

’ घरी रुग्णासाठी स्वतंत्र खोली आणि स्वच्छतागृह असावे.

’ रुग्णाला सहव्याधींची पाश्र्वभूमी नसावी.

’ रुग्ण ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला किं वा श्वसनविकारी नको.

’ रुग्णाची काळजी घेण्यासाठी घरात माणूस असणे आवश्यक.