पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून प्राधिकरणवासीयांसाठी आणखी एक बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात येणार आहे. निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २५ मध्ये पंधरा गुंठे जागेत सिमेंटचे जुने गोदाम पाडून त्या जागी दुमजली सभागृह बांधण्यात येणार असून छोटय़ा कार्यक्रमांना अत्यल्प दरामध्ये हे सभागृह उपलब्ध होणार असल्यामुळे सामान्य नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

पिंपरी प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर प्राधिकरणाच्या प्रकल्पासाठी लागणारे सिमेंट तसेच इतर साहित्य ठेवण्यासाठी पंधरा गुंठे जागेत गोदाम बांधण्यात आले होते. प्राधिकरणाचे नव्याने प्रकल्प सुरू नाहीत किंवा भविष्यात होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जुन्या झालेल्या गोदामाची प्राधिकरणाला आता गरज उरलेली नाही. त्यामुळे ते पाडून त्या जागी दोन मजली बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात येणार आहे. तळमजल्यावर वाहनतळ, पहिल्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह आणि दुसऱ्या मजल्यावर पाहुण्यांसाठी खोल्या तसेच भोजनादीची व्यवस्था करण्यासाठी खोल्या बांधण्यात येणार आहेत. या बहुउद्देशीय सभागृहामध्ये विवाहाशिवाय इतर छोटे कार्यक्रम आयोजित करता येतील अशी व्यवस्था असेल.

प्राधिकरणामध्ये सर्वसामान्यांना परवडतील अशा दरामध्ये सभागृह उपलब्ध नाहीत. प्राधिकरणाने या सभागृहाचे काम पूर्ण केल्यानंतर सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.