हडपसर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा खून केल्याच्या आरोपावरून आठ जणांस खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. काळेपडळ भागात राजकीय आणि सामाजिक वर्चस्वातून हा खून केल्याचे समोर आले आहे.
अनिल तुकाराम सोमवंशी (वय २८, रा. काळेपडळ, हडपसर), आशुतोष ऊर्फ पिंक्या अशोक बुट्टे (वय २७, रा. उरळीकांचन), अनिल सुभाष राख (वय ३५), धनंजय आनंद वनांगडे (वय २२), राजू रावसाहेब कांबळे (वय २८), अमित चंद्रकांत घाडगे (वय २५), गणेश ऊर्फ मुक्या रामलू चव्हाण (वय २०, रा. सर्वजण हडपसर) आणि अमित फल्ले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत सचिन शहाजी शेलार (वय ३२, रा. ओंकार कॉलनी, काळेपडळ, हडपसर) यांचा खून झाला होता. या प्रकरणी त्यांचा मित्र मनोज कदम (वय २४, रा. हडपसर) याने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याचा खंडणी विरोधी पथक समांतर तपास करीत होते. या पथकाचे कर्मचारी गणेश माळी यांना मिळालेल्या माहितीवरून नाशिक फाटा येथे रविवारी रात्री या आरोपींना पकडण्यात आले. अटक केलेल्या आरोपींवरही गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.
हडपसरच्या काळेपडळ भागात मयत हा अनेक वर्षांपासून राहण्यास आहे. आरोपी या भागात राहण्यास आहेत. शेलार हा सामाजिक कामात असल्यामुळे भागात प्रसिद्धी वाढत होती. तर, आरोपींना त्याचे वर्चस्व नको होते. त्यातून त्यांच्यात वादावादीही झाली. शेलार याने आरोपींना काही वेळा मारहाण केली होती. त्याचा राग मनात ठेवून एक महिन्यापासून आरोपी त्याचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होते. त्यानुसार शनिवारी रात्री दहाजणांनी मिळून कोयत्याने वार करून शेलारचा खून केला. या गुन्ह्य़ात अटक केलेल्या सोमवंशी, राख यांच्यावर तीन गुन्हे, बुट्टेवर पाच, घाडगे, कांबळे, वनांगडे यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2014 2:45 am