अजित पवार यांचे सुपुत्र मावळ मतदार संघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचार सभेदरम्यान राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत मनसेचाही झेंडा पाहायला मिळाला. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर उपस्थिती राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीला अशा प्रकारे जाहीर पाठिंबा देण्याचे आदेश अद्याप दिलेले नाहीत. दरम्यान, यावेळी माजी मंत्री मदन बाफना, पार्थ पवार, बबनराव भेगडे यांच्यासह काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राज ठाकरे यांनी भाजपाविरोधी भुमिका दोन दिवसांपूर्वीच जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पराभूत करण्यासाठी मनसेने ही भूमिका घेतल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. आज मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांची प्रचार सभा वडगाव येथे होत आहे.

दरम्यान, परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे एकत्र पाहायला मिळाले त्यामुळे याची चर्चा सुरु आहे. मात्र, यामुळे राज ठाकरेंनीच तर हे आदेश दिले नाहीत ना चर्चा इथे होती. मात्र, राष्ट्रवादीला अशा प्रकारे पाठिंब्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेले नाहीत असे मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.