सहकारनगर येथे महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्राची नासधूस करणाऱ्या टोळक्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांना मारहाण झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या प्रकरणी दत्तावाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पालिकेच्या वतीने सहकारनगर २ येथे तीस लाख रुपये खर्च करून सांस्कृतिक केंद्र बांधण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी परिसरातील काही तरुणांनी सांस्कृतिक केंद्राची दारे, खिडक्या व सीमाभिंतीची नासधूस केली होती. या प्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्मीनगर पोलीस चौकीमध्ये तक्रारही दिली होती. गुरुवारी संध्याकाळी जगताप व पालिकेचे अधिकारी सांस्कृतिक केंद्राच्या दुरुस्तीचे काम करण्याच्या दृष्टीने पाहणीला गेले होते. त्या वेळी काही जण सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात क्रिकेट खेळत होते. त्यांना जगताप यांनी बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या टोळक्याने जगताप यांच्यासह इतरांना शिवीगाळ केली. काही जण जगताप यांच्या अंगावर धावून गेले व त्यांना मारहाणही केली.