21 January 2021

News Flash

“मुख्यमंत्री फक्त शहरांची नावं बदलण्यात मश्गुल, महिला सुरक्षेचं काय?”

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे राज्यभर घंटानाद आंदोलन

उत्तर प्रदेशमधील बदायूमध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सकाळी ११ वाजता सुरू झाले. राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबाहेर जमून घंटानाद करीत निदर्शने करण्यात आली आणि महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (अजय बिष्ट) यांच्या नावे लिहिलेली पत्रे टपाल मास्तरांना देण्यात आली.

महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे येथील लक्ष्मी रोड, सिटी पोस्ट टपाल कार्यालयाबाहेर आंदोलनाची सुरुवात केली. उत्तरप्रदेश बदायु इथे एका भगिनीवर घडलेल्या सामुहिक बलात्कार आणि हत्याकांडाच्या निषेधार्थ आज मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निषेधाची पत्रे पाठवण्यात आली. “फक्त शहरांची नावे बदलण्यातच हे मुख्यमंत्री मश्गुल असून त्यांना महिलांच्या सुरक्षेचे काहीही घेणेदेणे नाही. लहान मुली, युवती, अंगणवाडीच्या ५० वर्षीय महिलादेखील या राज्यात सुरक्षित नाहीत. त्यामुळे देशाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. नामुष्की सहन करावी लागत आहे”, अशा आशयाची पत्रे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून पाठवण्यात आली असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

“समस्त देशाचे श्रद्धास्थान असलेल्या रामजन्मभूमीमध्ये आज सर्वात जास्त गुन्हे होतात. महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होतात हे अत्यंत खेदजनक आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच जबाबदार आहेत. ‘योगी’ आदित्यनाथ म्हणून देश त्यांना ओळखतो. पण गुन्हेगारांचे आणि गुन्हयांचे नंदनवन असलेल्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ‘योगी’ हे संबोधन वापरण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही”, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखीदेवी यांच्यांवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं. “पीडित परिवाराला भेटण्यास जाऊन आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, ‘जर पीडित महिला संध्याकाळच्या वेळी एकटी गेली नसती तर ही घटना घडली नसती’, असं वक्तव्य केलं. राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या म्हणून नाही तर एक महिला म्हणून एका पीडित महिलेबाबत असं वक्तव्य करणं खूपच भयंकर आणि धक्कादायक आहे”, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.

“या सर्व पार्श्वभूमीवर देशाला गृहमंत्री आहेत का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे प्रचारमंत्री आहेत हे कळायला मार्ग नाही. सदासर्वकाळ अमित शहा हे कोणत्या ना कोणत्या राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असतात. जर पदाला योग्य न्याय देऊ शकत नसतील तर गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ प्रचारमंत्री म्हणून काम करावं”, अशा शब्दात चाकणकर यांनी अमित शाह यांच्यावरही टीका केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 4:04 pm

Web Title: ncp female leader rupali chakankar slams cm yogi aadityanath amit shah bjp over women safety vjb 91
Next Stories
1 पुणे विद्यापीठाची खरडपट्टी
2 “माझ्याव्यतिरिक्त कोणाचा फोन आला तर मला सांगा,” अजित पवारांनी पोलिसांसमोर भरला सज्जड दम
3 चोर आले म्हणून पोलीस पळून जातात ही केविलवाणी गोष्ट- अजित पवार
Just Now!
X