पिंपरी पालिका स्थायी समितीच्या रिक्त आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत त्या सर्व जागा राष्ट्रवादीने पटकावल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सगळ्या गटातटांचा व विधानसभा मतदारसंघांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. समितीतील सदस्यांची नावे पाहता अध्यक्षपदासाठी अजितदादांच्या मनात कोणता उमेदवार आहे, याचा अंदाज सर्वानाच आला आहे.
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रसाद शेट्टी, शांताराम भालेकर, अतुल शितोळे, विनायक गायकवाड, बाळासाहेब तरस, सुनिता गवळी, रमा ओव्हाळ, संध्या गायकवाड यांची निवड करण्यात आली. आधीच्या आठ सदस्यांमध्ये सुनिता वाघेरे, माया बारणे, छाया साबळे, आशा शेंडगे, शकुंतला धराडे, सद्गुरू कदम, गणेश लोंढे आणि महेश लांडगे यांचा समावेश आहे. १६ सदस्यांच्या समितीत राष्ट्रवादीचे निर्विवाद बहुमत असून विरोधकांचे अस्तित्व नामधारी आहे. नव्या  सदस्यांची नियुक्ती करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना तारेवरची बरीच कसरत करावी लागली. इच्छुकांची संख्या प्रचंड तर जागा मर्यादित होत्या. निवडणुकांना सामोरे जाताना जातीधर्माचे गणित, गटबाजी व मतदारसंघ असा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक नेत्यांनी सुचवलेली नावे बाजूला ठेवून अजितदादांनी स्वत:च्या अधिकारात काही नावे निश्चित केली आहेत. समितीतील सर्व सदस्यांच्या नावावर नजर टाकली असता सभापतीपदासाठी अजितदादांच्या मनात कोण असेल व सर्वाधिक संधी कोणाला असेल, याची स्पष्ट कल्पना येते. तथापि, याबाबतची अधिकृत घोषणा होण्यास अवधी असल्याने तोपर्यंत तर्कवितर्काना उधाण येणार आहे.