तेव्हा आणि आता

गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोक एकत्र यावेत, त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्याऐवजी आता ‘एक गाव एक गणपती’ सारखे नारे घुमावेत असा विस्तार गेल्या सव्वाशे वर्षांत झाला. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून आता मंडळांची संख्या शंभरपटींनी वाढली आहे. सुरुवातीला प्रबोधन करण्यासाठी सुरू झालेल्या उत्सवाचे स्वरूप हे गणेशोत्सव मंडळांचेच प्रबोधन करण्याची गरज भासावी असे झाले आहे. गणेशोत्सव सुरू करण्यामागे विविध प्रश्नांवर समाजाचे प्रबोधन करणे, समाजाला एकत्र आणणे, सामाजिक प्रश्नांची जाण करून देणे असे उद्देश होते. मात्र उत्सव झपाटय़ाने विस्तारत गेला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या भरमसाठ वाढली आणि उत्सवाच्या अवाढव्य स्वरूपानेच नवे प्रश्न तयार केले. वाहतूक, रस्त्यावर येणारे मांडव, ध्वनिप्रदूषणाची पत्रास न बाळगता उभ्या करण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकांच्या भिंती, रेंगाळणाऱ्या मिरवणुका अशा बदलांनी मंडळांचेच प्रबोधन करण्याची गरज गेल्या काही वर्षांमध्ये वाढू लागल्याचे दिसते आहे.

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

सार्वजनिक मंडळांकडून समाज प्रबोधन

गणेशोत्सव सुरू झाला तो अगदी मोजक्या दोन-तीन मंडळांपासून. आपला वाडा आणि परिसरातील नागरिकांना एकत्र करून एक गणपती वाडय़ात बसवायचा. त्यानिमित्ताने सर्व सामाजिक घटकांना एकत्र करायचे असे त्याचे स्वरूप होते. घरातील गणपती रस्त्यावर आणल्यामुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होईल अशी टीकाही उत्सवावर झाली. अशावेळी उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा व्हावा यासाठी मंडळांना प्रोत्साहन देण्यात येत होते. सार्वजनिक उत्सव सुरू करणाऱ्यांचे सत्कार केले जात होते. उत्सव सुरू झाला त्याच्या पुढील वर्षी संपूर्ण शहरातून शंभर मंडळांनी सार्वजनिक उत्सव सुरू केला. सगळ्या मंडळांची एकत्रच मिरवणूक निघत असे. स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय, सामाजिक घडामोडी, प्लेग, पटकी सारख्या साथी यातूनही उत्सव टिकून राहिला. तो टिकावा यासाठी समाजातील अनेकांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले. उत्सवाचे स्वरूप मोठे होऊ लागल्यावर त्याचे नियमन करण्यासाठी त्यावेळच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन गणेश नियामक मंडळ स्थापन केले. उत्सव अधिक चांगला करण्यासाठी नव्या कल्पना मांडणे, गैरप्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील राहणे, मिरवणूक वेळेवर संपवणे अशा जबाबदाऱ्या हे मंडळ पुरे करत होते. उत्सवातील गैरप्रकार टाळण्यासाठी या नियामक मंडळाकडून गणेश मंडळांना सूचना देण्यात येत असत आणि मंडळे त्या सूचना पाळतही असत. स्वातंत्र्य चळवळीत या सार्वजनिक गणेश मंडळांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९४८ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या ही सुमारे ३०० पर्यंत पोहोचली होती. पोलीस किंवा व्यवस्थेकडून कोणतेही संरक्षण किंवा साहाय्य न मिळताही उत्सव शांततेत होत होता.

मंडळांचेच प्रबोधन करण्याची वेळ

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या ही १९८० च्या आसपास साधारण हजापर्यंत पोहोचली होती. सत्तरच्या दशकात उत्सवात विद्युत रोषणाई, ध्वनिक्षेपक यांचे महत्त्व वाढू लागले. शहरात ६५ साली अगदी दंगल, महागाई अशा सगळ्यांना तोंड देऊनही शांततेत झालेल्या उत्सवाने हळूहळू सामान्यांना कानात बोटे घालण्याची वेळ आणली. आजघडीला शहरात नोंदणी झालेली मंडळे ही साडेचार हजार आहेत. याशिवाय नोंदणी न झालेली जागा मिळेल तेथे मांडव टाकून उभी राहिलेली, सोसायटय़ांमधील मंडळे मिळून जवळपास १० हजार मंडळे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक ऐक्यासाठी सुरू झालेल्या गणेशोत्सवात आता मंडळांचेही आपापसात ऐक्य राहिले नसल्याचे दिसते. एखाद्या मंडळात वाद झाला की त्यातून बाहेर पडलेला गट आपली गणेश मूर्ती आणून स्वतंत्र मंडळ स्थापन करतो. एकाच रस्त्यावर समोरासमोर उभ्या ठाकलेल्या गणेशोत्सवाच्या मंडपात कुणाच्या मंडपातील आवाज मोठा याच्या स्पर्धा सुरू असल्याचे दिसते. पूर्वापार उत्सवातील घटक असलेली मोजकी मंडळे वगळता बहुतेक सर्व मंडळांमध्ये उत्सवाचा मूळ उद्देश शिल्लक आहे का, असा प्रश्न उपस्थित व्हावा अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मंडळांच्या कोलाहलात लोकांचा म्हणून सुरू झालेल्या या उत्सवापासून दूर जाण्याकडेच सामान्य माणसाचा आता कल आहे.