‘देवा श्रीगणेशा.. देवा श्रीगणेशा’ या गीतावर नृत्य सादर करीत बाळगोपाळांनी संकटाचा सामना करण्याची शक्ती आम्हाला दे असे साकडे गणरायाला घातले. आयुष्यात काटय़ाच्या रूपाने कितीही अडचणी आल्या तरी कळी उमलून त्यावर साठणारा दवबिंदू म्हणजेच नीहार होण्याची संधी आम्हाला मिळतेय हेच जणू बालचमूंनी आपल्या कलाविष्कारातून दाखवून दिले.
‘वंचित विकास’ संचालित ‘नीहार’ संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त लोहगाव येथील संस्थेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांनी नृत्य, नाटक आणि नाटय़छटा सादर करीत जगण्याची उमेद दिली. ‘नाच रे मोरा’ ते ‘नवराई माझी लाडाची’ या गीतावर लहानग्या पावलांनी केलेले नृत्य, भाजीवाल्या बाईची कहाणी सांगणारी नाटय़छटा असे कार्यक्रम मुलांनी सादर केले. महिला आणि बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त रवी पाटील, सामाजिक कार्यकर्त्यां सुनीता कल्याणी, स्वप्नजा वाघमारे, शिरीष कुलकर्णी, यज्ञेश बूच, संस्थेच्या अध्यक्षा आसावरी पानसे, विलास चाफेकर, मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर या वेळी उपस्थित होत्या. नीहार संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले.