पुणे : भारतीयांवर अन्याय करून करोना प्रतिबंधक लस परदेशात निर्यात के लेली नाही. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण होण्यास किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे, असे सीरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले असून लस निर्यातीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा अनाठायी असल्याचे त्यांनी स्पष्ट के ले आहे.

सीरम इन्स्टिटय़ूटतर्फे  मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून पूनावाला यांनी करोना लशीचे उत्पादन, निर्यात आणि भारतातील लसीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चाबाबत भाष्य के ले आहे. जगातील सर्व देशांबरोबरच भारतातही करोना संकट गंभीर आहे. जानेवारी २०२१ मध्ये सीरमकडे लशींचा पुरेसा साठा उपलब्ध होता. त्या बळावर देशातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्याच दरम्यान देशात आढळणाऱ्या नव्या करोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे देशातील साथ आटोक्यात आल्याचा समज आरोग्य तज्ज्ञांसह सर्वानी करून घेतला होता. मात्र, जगातील काही देशांमध्ये त्यावेळी करोना महासाथीचे संकट अत्यंत गंभीर होते. संकटकाळात परस्परांना मदत करण्याचे देशाचे धोरण आहे. त्याचा उपयोग वेळोवेळी इतर देशांना तसेच भारतालाही झाला आहे, असे पूनावाला यांनी म्हटले आहे.

या धोरणाचा भाग म्हणून कोव्हॅक्स गटातील देशांना लस पुरवठा करणे अनिवार्य आहे. करोना महासाथ हे जागतिक संकट असल्याने सर्व देश सुरक्षित होईपर्यंत भारत सुरक्षित असणे शक्य नाही. मात्र, भारताची लोकसंख्या लक्षात घेता लसीकरण मोहीम दोन ते तीन महिन्यात पूर्ण होणे शक्य नाही. किमान दोन ते तीन वर्षे ते चालणार हे स्पष्ट आहे. अमेरिके नंतर तब्बल दोन महिन्यांनी भारतात करोना लशीच्या आपत्कालीन वापराची परवानगी आम्हाला मिळाली. तरीही लशींच्या २० कोटी मात्रा आम्ही प्राधान्याने भारताला दिल्या आहेत. भविष्यातही उत्पादनाचा वेग वाढवण्याबरोबरच लस पुरवठय़ाबाबत भारतालाच प्राधान्य असेल असे स्पष्टीकरणही पूनावाला यांच्याकडून देण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची अपेक्षा

न्यूयॉर्क : भारतात करोनाची दुसरी लाट तीव्र झाल्याने सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तेथे लसपुरवठा सुरू केला. परिणामी जगभरातील अन्य गरीब देशांना लसपुरवठा करण्याच्या कोव्हॅक्स कार्यक्रमासाठी सीरमने निश्चित केलेल्या लसपुरवठय़ास विलंब होत आहे. मात्र  भारतातील साथ आटोक्यात आल्यानंतर सीरमने हा पुरवठा पूर्ववत करावा, असे  जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी मंगळवारी म्हटले आहे.