विद्या सहकारी बँकेच्या वतीने ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने दोन संगणक प्रणाली सुरू करण्यात येणार आहेत. बँकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ९ जूनला त्याचे उद्घाटन केले जाणार असल्याचे बँकेकडून कळविण्यात आले आहे.

आर्थिक क्षेत्रातील रोजच्या घडामोडी, बँकिंगविषयक कायदा व न्यायनिवाडय़ाची माहितीसह बँकिंगचे ज्ञान देणारी तसेच ग्राहकांचे व्यासपीठ असणारी ‘विद्यावाणी’ या नावाने एक संगणक प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. संबंधित प्रणालीचे अ‍ॅप्लिकेशन स्मार्ट फोनवर गुगल प्ले स्टोअरमधून ‘विद्यावाणी’ नावाने डाऊनलोड करता येणार आहे. ग्राहकांच्या प्रतिक्रिया, शंका व सूचना यांनाही त्यात स्थान असणार आहे.

बँकेमध्ये असलेली महत्त्वाची कागदपत्रे हाताळल्याने खराब होतात. काही वेळेला गहाळ होतात. त्याला आळा बसावा, यासाठी बँकेने नागरी बँकिंग क्षेत्रात प्रथमच ‘डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअर अ‍ॅण्ड डिजिटायझेशन सव्‍‌र्हिसेस’ ही प्रणाली विकसित केली आहे. या दोन्ही प्रणालींचे उद्घाटन ९ जूनला सकाळी ११ वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयात सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या हस्ते व आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.