राज्यातील शाळांचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले असले, तरी रात्रशाळांतील विद्यार्थ्यांना या ऑनलाइन वर्गापासून वंचित राहावे लागत आहे. करोना संसर्गामुळे काहींच्या हाताला काम नाही, तर अनेकांसाठी ऑनलाइन शिक्षणासाठीच्या सोयीसुविधाही नाहीत.

करोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील शाळा सुरू करता आलेल्या नाहीत. मात्र १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन पद्धतीने अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. रोज तीन तासांपर्यंत विविध विषय शिकवले जाऊ लागले आहेत. मात्र, रात्रशाळांतील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अजून सुरू होऊ शकलेले नाही. टाळेबंदीच्या आर्थिक अडचणींसह काहींचा रोजगार गेला आहे, अनेकांकडे ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा नाहीत.

‘माझे घर आणि कामाचे ठिकाण दूर आहे. सध्या टाळेबंदीमुळे वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने रोज ये-जा करणेही शक्य नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणीच राहावे लागत आहे. ज्यांच्याकडे काम करते, त्यांनी मला शिक्षणासाठी स्मार्टफोन वापरण्यास दिला आहे. शाळेने वर्ग सुरू के ल्याने किमान माझे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. मात्र माझ्याकडे स्वत:चा स्मार्टफोन नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी ही सोय झाली नसती, तर माझे शिक्षण सुरू झाले नसते. तसेच अद्याप माझ्याकडे पुस्तके ही नाहीत. सध्या इंग्रजी आणि गणित शिकवण्यास सुरुवात झाली आहे. पण अनेक विद्यार्थ्यांना सोयीसुविधा नसल्याने शिकता येत नाही,’ असे आबासाहेब अत्रे रात्रप्रशालेत दहावीत शिकणाऱ्या लक्ष्मी नाडर या विद्यार्थिनीने सांगितले.

पूना नाईट स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारा सिद्धनाथ हजारे म्हणाला, की माझ्याकडे अतिशय साधासा स्मार्टफोन आहे. पण तो  ध्वनिचित्रफिती पाहण्यासाठी पुरेसा नाही. त्यामुळे शाळेकडून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दिल्या जाणाऱ्या अभ्यासावरच शिकावे लागत आहे. मी एका हॉटेलमध्ये काम करत होतो. करोनामुळे हॉटेल बंद झाल्याने गावी यावे लागले. त्यामुळे सध्या काम नसल्याने नवीन स्मार्टफोन घेण्याएवढी आर्थिक कु वतही नाही. वर्गात प्रत्यक्ष शिक्षण होते तसे स्मार्टफोनद्वारे होत नाही. त्यामुळे आता शाळा सुरू होण्याचीच प्रतीक्षा आहे.

चिंचवडच्या चिंतामणी रात्रप्रशालेतील ज्ञानेश्वर वानखेडे म्हणाला, ‘माझ्याकडे स्मार्टफोन असल्याने शिकण्याची व्यवस्था झाली आहे. शाळेकडून अभ्यास रोज व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला जातो. तसेच दहावी झालेल्या मित्रांची पुस्तके  मला आणि माझ्या एका मित्राला मिळाली. पण माझ्या काही मित्रांकडे स्मार्टफोन नाही. त्यामुळे त्यांचा अभ्यास सुरू होऊ शकलेला नाही.’

राज्यात १६७ रात्रशाळा आणि ५४ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यातून ३३ हजार विद्यार्थी दिवसा काम करून रात्री शाळेत शिकतात. सध्या रात्रशाळांतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठीच्या ध्वनिचित्रफिती, पाठांची माहिती पाठवली जाते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठीच्या सुविधा नाहीत. त्यांच्यासाठी पारंपरिक शिक्षण हाच उपाय आहे. वर्गात शिकताना त्यांना काही अडचण आल्यास त्याचे निरसन लगेच होते. पण ऑनलाइन शिक्षणात तशी सुविधा नाही. तसेच या विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी पाठपुरावा करावा लागतो. या विद्यार्थ्यांची आर्थिक सुस्थिती नसल्याने त्यांना खासगी शिकवण्याही करता येत नाहीत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणात रात्रशाळांतील विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.

प्रा. अविनाश ताकवले, महाराष्ट्र प्रदेश रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघ