कामे वेळेत न झाल्यास करार रद्द करण्याचाही आदेश
पुणे ते कोल्हापूर महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबद्दल सर्व लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर संबंधित सर्व कामे तातडीने पूर्ण करा, असा आदेश केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी कंपनीला दिला असून, कामे वेळेत न केल्यास कंपनीबरोबर केलेला करार रद्द करण्याचेही आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे सातारा रस्त्याचे रेंगाळलेले काम वेळेत पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी गडकरी यांनी प. महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पुणे ते कोल्हापूर दरम्यान सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाबाबत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी गडकरी यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक कामे रेंगाळली आहेत. टोल मात्र मोठय़ा प्रमाणात वसूल केला जात आहे. ठेकेदाराकडे अनेक वेळा तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, अशी बहुतांश आमदार, खासदारांची तक्रार होती.
रस्त्याचे हे काम रिलायन्स कंपनीला देण्यात आले आहे. या रस्त्यावर आठ उड्डाणपुलांचे काम सुरू असून, त्यातील चार पुलांचे काम पूर्ण झाले आहे, तर चार पुलांचे काम बाकी आहे. त्याबाबत गडकरी यांनी कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत फैलावर घेतले. ‘तुम्ही कामे वेळेत करत नाही. तुम्ही कामांना विलंब करत असल्याबद्दल माझ्याकडेही लोकप्रतिनिधींची अनेक निवेदने येतात. मला फोन येतात, तुमच्या कामाबद्दल लोकप्रतिनिधी असमाधानी आहेत,’ असे गडकरी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीत स्पष्टपणे सांगितले. या कामांमध्ये काही अडचण आल्यास थेट मला कळवा, असे त्यांनी लोकप्रतिनिधींनाही सांगितले.