माझा जन्म कर्नाटकमध्ये झाला असला तरी मी आधी भारतीय आणि नंतर कर्नाटकी आहे. आपण सारेच आधी भारतीय आहोत. कन्नड नव्हे, मी भारतीय लेखक आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी रविवारी व्यक्त केले. मातृभाषा कन्नड असल्याने केवळ याच भाषेत लिहितो. पण, माझ्या लेखनाची संकल्पना सदैव भारतीय असते. आपल्या हृदयातील सत्य सांगणाऱ्या साहित्याची अभिव्यक्ती केवळ मातृभाषेतून करता येते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे ‘साक्षी’ आणि ‘उत्तरकांड’ या कादंबरीच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन भैरप्पा यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. लेखक विश्वास पाटील, समीक्षक प्रा. रणधीर शिंदे, लेखिका-अनुवादिका उमा कुलकर्णी आणि प्रकाशक सुनील मेहता या वेळी उपस्थित होते.

भैरप्पा म्हणाले,की हिंदुत्ववाद भारतीय तत्त्वज्ञानामुळे स्वीकारला गेला आहे. हिंदू धर्म देव नाकारण्याचे स्वातंत्र्य देतो. मी ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचा अभ्यास केला आहे. हे स्वातंत्र्य या धर्मामध्ये नाही. रामायण आणि महाभारत हे जगण्याचे मूल्य आहे.

तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्याशिवाय मूल्याधिष्ठित मांडणी करता येत नाही. कादंबरी म्हणजे मनोरंजन नाही. वस्त्रहरणावेळी द्रौपदीच्या मनात कोणता विचार आला असेल, हे व्यासांसह अनेक प्रतिभावंतांच्या ध्यानात आले नाही. महाभारतातील हे अलक्षित कोपरे हेरून ते मी लेखनातून मांडतो.