सूडबुद्धीने कारवाईचा आरोप; भाजप-राष्ट्रवादीतील राजकारण तापले

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आणि तेथून परत राष्ट्रवादीत आलेले पिंपळे गुरवचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या बंगल्यातील वाढीव बांधकामास बजावण्यात आलेल्या नोटिशीवरून बरेच राजकारण तापले आहे. या वादाचे पडसाद जगताप यांच्या भावकीसह भाजप-राष्ट्रवादीतही उमटण्याची चिन्हे आहेत.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे राजेंद्र जगताप हे चुलत बंधू आहेत. काही महिन्यापूर्वीपर्यंत ते आमदारांचे कट्टर समर्थक मानले जात होते. सध्या त्यांच्यात तीव्र मतभेद आहेत. लक्ष्मण जगताप राष्ट्रवादीत होते, तेव्हा राजेंद्र जगतापही त्यांच्यासोबत होते. २०१२ च्या निवडणुकीत राजेंद्र जगताप राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर, लक्ष्मण जगताप भाजपमध्ये गेले, तेव्हा राजेंद्रही भाजपमध्ये गेले. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत राजेंद्र यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र, ते पराभूत झाले. त्यांचे पुतणे नवनाथ जगताप अपक्ष निवडून आले. या निवडणुकीनंतर स्थानिक समीकरणे बदलली. राजेंद्र यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते राष्ट्रवादीत गेल्यापासून त्यांचे अनेक मुद्दय़ांवरून भाजप नेत्यांशी खटके उडत आहेत. अशा परिस्थितीत, त्यांच्या ‘मुक्तांगण’ या बंगल्यातील वाढीव बांधकामावरून राजकारण तापले आहे. भाजप नेत्यांनी सूडबुद्धीतून अवैध बांधकामाची नोटीस बजावण्यास भाग पाडले असल्याचा आरोप राजेंद्र जगताप यांनी केला आहे. पिंपळे गुरव-सांगवी परिसरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. तेथे डोळेझाक करणारे पालिका अधिकारी आपल्याला नोटीस बजावण्याची तत्परता कशी काय दाखवतात, असा मुद्दा जगतापांनी उपस्थित केला आहे. पालिकेने आणि भाजपने िहमत असेल तर कारवाई करून दाखवावी, असे आव्हान राजेंद्र जगताप यांनी दिल्याने या विषयावरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

बंगला १५ वर्षांपूर्वीचा असून तो अधिकृत आहे. स्थानिक भाजप नेते सूडभावनेतून घाणेरडे राजकारण करत आहेत. िहमत असेल तर त्यांनी आपले बांधकाम पाडून दाखवावे.

राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक

राजेंद्र जगताप यांचा बंगला अधिकृत आहे. मात्र, त्यातील वाढीव बांधकामांसाठी पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे जगतापांना नोटीस बजावण्यात आलेली आहे.

प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता