केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे अर्थकारण ढवळून काढणाऱ्या १९८२ मधील संपामुळे लालबाग-परळ परिसरातील गिरणी कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची झालेली होरपळ ‘लस्ट फॉर लालबाग’ या विश्वास पाटील यांच्या आगामी कादंबरीमध्ये चित्रित झाली आहे. राजहंस प्रकाशनतर्फे नोव्हेंबरमध्ये ही कादंबरी वाचकांच्या हाती पडणार आहे.
‘पानिपत’, ‘झाडाझडती’ आणि ‘महानायक’ या कादंबऱ्यांचे लेखक विश्वास पाटील यांची दीर्घ कालावधीनंतर ही कादंबरी येत आहे. कादंबरीच्या शीर्षकातील लस्ट हा शब्द लालसा या अर्थाने वापरला आहे, असे विश्वास पाटील यांनी शनिवारी सांगितले. १९८२ ते २००८ एवढा कालपट मांडणाऱ्या या कादंबरीमध्ये मुंबईच्या अंडरवर्ल्ड इतकेच ओव्हरवर्ल्ड हे देखील महत्त्वाचे आणि उलटय़ा काळजाचे आहे, याकडे लक्ष वेधले आहे. गिरणगावाला नागवल्या गेलेल्या या संपामध्येही जीवनसंघर्ष करणाऱ्या झुंजार माणसांची ही कहाणी असल्याचे त्यांनी सांगितले. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर आणि डॉ. सदानंद बोरसे या वेळी उपस्थित होते.