पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारामध्ये ‘नो पार्किंग झोन’ मध्ये उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे प्रवाशांना होणारा त्रास व कोंडी लक्षात घेता वाहतूक पोलिसांबरोबरच आता अशा वाहनांवर रेल्वे प्रशासनाच्या वतीनेही कारवाई सुरू करण्यात आली आहे. या वाहनचालकाकडून दंडाची आकारणी करण्यात येत आहे.
स्थानकाच्या परिसरामध्ये ‘नो पार्किंग झोन’मध्ये वाहने लावून अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार रेल्वेच्या नियमांमध्ये आहेत. मात्र, आजवर त्याचा वापर करण्यात आला नव्हता. स्थानकाच्या आवारामध्ये त्याचप्रमाणे स्थानकालगत असणाऱ्या रस्त्यांवर अशा प्रकारची कारवाई काही वेळेला वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत होती. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्थानकाच्या परिसरामध्ये ‘पे अॅण्ड पार्क’ पद्धतीची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे स्थानकाच्या मागील प्रवेशद्वारातून येणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांसाठी राजा बहादूर मिल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
रेल्वे स्थानकात येण्याचा मार्ग व बाहेर पडण्याच्या मार्गावर सकाळी व संध्याकाळच्या वेळेला मोठय़ा प्रमाणावर वाहने लावली जातात. सकाळी व संध्याकाळी एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर स्थानकात गाडय़ा येत असल्याने या वेळांमध्ये आतमध्ये येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. याच काळामध्ये या वाहनांमुळे प्रवाशांना स्थानकाच्या बाहेर पडण्यास अडथळा होतो व काही वेळेला मोठी कोंडीही निर्माण होते. यावर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांची बैठक झाली. त्यानुसार स्थानकात काही ठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ तयार करण्यात आले आहेत. तेथे वाहन लावल्यास चारचाकीसाठी ५०० रुपये, तर दुचाकीसाठी २५० रुपये दंडाची आकारणी करण्यात येत आहे. कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी त्यांची वाहने योग्य जागेतच लावावीत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.