कोथरूड, येरवडा आणि धनकवडीत भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव वाढला आहे. या तीन भागांमधून पालिकेकडे भटक्या कुत्र्यांबद्दलच्या सर्वाधिक तक्रारी येत आहेत, अशी माहिती उप आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली.
पालिकेतर्फे शहराच्या विभाग (झोन) क्र. १ मध्ये भटक्या कुत्र्यांचे लसीकरण तसेच त्यांच्या निर्बीजीकरणाचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण करण्यात आले असून या भागातील कुत्र्यांचा त्रास आता कमी होण्याची शक्यता आहे. विभाग क्रमांक १ मध्ये कोथरूड, घोले रस्ता, वारजे, कर्वेनगर, औंधचा समावेश होतो. या भागात एकूण १४५७ कुत्र्यांना पकडून त्यांचे लसीकरण व निर्बीजीकरण करण्यात आले. यांतील सर्वाधिक भटकी कुत्री औंध भागात आहेत.
डॉ. साबणे म्हणाल्या, ‘‘सध्या धनकवडी, बिबवेवाडी, टिळक रस्ता, भवानी पेठ, कसबा पेठ आणि पुण्याच्या मध्य भागात भटक्या कुत्र्यांवरील कारवाई सुरू आहे. या कारवाईत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण केल्यानंतर त्यांना तीन दिवस ताब्यात ठेवून पुन्हा त्या-त्या भागात सोडले जाते. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणामुळे त्यांची संख्या कमी होणे व त्यामुळे उपद्रव कमी होणे या गोष्टीला काहीसा वेळ लागू शकतो.’’
कारवाईनंतरही नागरिक नाराजच
कुत्र्याचे निर्बीजीकरण व लसीकरण केल्यांनतर त्यांना त्याच भागात परत सोडणे पालिकेस बंधनकारक आहे. अशा पद्धतीने परत सोडलेली कुत्री चावणार नाहीत याची खात्री देता येत नसल्यामुळे पालिकेने कारवाई करूनही नागरिकांची नाराजी कायम आहे. उपद्रवी भटक्या कुत्र्यांना शहराबाहेर ग्रामीण भागात सोडून द्या किंवा त्यांना ठार मारा, अशा मागण्या नागरिकांकडून केल्या जात असल्याचे पालिकेतील सूत्रांकडून कळते.