बारावीनंतरच्या ‘एएनएम’ (ऑग्झिलिअरी नर्सिग मिडवायफरी) आणि ‘जीएनएम’ (जनरल नर्सिग अँड मिडवायफरी) या परिचर्या अभ्यासक्रमांना ‘व्यावसायिक अभ्यासक्रम’ म्हणून मान्यता मिळणे गेल्या पाच महिन्यांपासून रखडले आहे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थिनींना याचा फटका बसला असून या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्या असल्याची माहिती ‘महाराष्ट्र परिचर्या परिषदे’चे अध्यक्ष रामलिंग माळी यांनी दिली.
एएनएम आणि जीएनएम हे अभ्यासक्रम अनुक्रमे दोन व तीन वर्षांचे आहेत. माळी म्हणाले,‘या दोन्ही परिचर्या अभ्यासक्रमांना राज्य शासनाने ‘व्यावसायिक अभ्यासक्रम’ म्हणून मान्यता जाहीर न केल्यामुळे हे अभ्यासक्रम चालवणाऱ्या शिक्षणसंस्थांनी जूनपासून अभ्यासक्रमाचे शुल्कही जाहीर केलेले नाही. अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमाची मान्यता मिळेपर्यंत त्यातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनस्तरावर मान्यता मिळणार नाही. शिक्षण समिती या अभ्यासक्रमांचे शुल्क मान्य करत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडून शिक्षण शुल्क (शिष्यवृत्ती) मिळत नाही.’
‘तेहमी ग्रँट इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिग एज्युकेशन’च्या बीएस्सी व एमएस्सी नर्सिग विद्यार्थ्यांच्या गुरूवारी झालेल्या पदवीप्रदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माळी उपस्थित होते. रुबी हॉल रुग्णालयाचे प्रमुख कार्यकारी संचालक बोमी भोटे, संस्थेच्या प्राचार्य एस. डुंबरे या वेळी उपस्थित होते.

‘अनधिकृत परिचर्या शिक्षण संस्थांविरुद्ध पुरावेच नाहीत’
२००५ ते २००८ या कालावधीत अशा १८८ शिक्षणसंस्था बंद करण्यात आल्या असून २००८ ते २०१२ या कालावधीत १२ अनधिकृत परिचर्या शिक्षणसंस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर २०१४- १५ मध्ये २ संस्थांना नोटिसा देण्यात आल्या. राज्यात काही अनधिकृत परिचर्या संस्था चालवल्या जातात, पण त्याविरुद्ध काहीही पुरावे उपलब्ध नसतात, असे रामलिंग माळी यांनी सांगितले. ते म्हणाले,‘अनधिकृत परिचर्या महाविद्यालयांवर शासन निर्णयानुसार कारवाई सुरू आहे. संस्थाचालक, विद्यार्थी किंवा नागरिक यांनी निनावी पत्र पाठवून तक्रार केली तरी कारवाई केली जाते. परंतु तक्रारीबरोबर पुरावे असणे गरजेचे आहे. संस्थेची जाहिरात, हँडबुक, बॅनर असा काहीतरी पुरावा गरजेचा असतो. अनेकदा हे पुरावेच मिळत नाहीत.’
‘एएनएम नर्सिग’ शिकवणाऱ्या ५० टक्के संस्था बंद!
‘भारतीय परिचर्या परिषदे’ने एएनएम अभ्यासक्रमाची शिक्षणपात्रता वाढवून ती दहावीची बारावी केल्यानंतर गेल्या चार वर्षांत या अभ्यासक्रमाला ओहोटी लागली आहे. २०१२ पर्यंत राज्यात ४४४ एएनएम शिक्षणसंस्था होत्या, त्यांची संख्या जवळपास ५० टक्क्य़ांनी घटली असून आता राज्यात ‘एएनएम नर्सिग’ शिकवणाऱ्या केवळ २४४ मान्यताप्राप्त संस्था उरल्या आहेत. तर ‘जीएनएम नर्सिग’ शिकवणाऱ्या ४२२ संस्था आहेत. यामुळे दहावीनंतर परिचर्येचे शिक्षण देणारा अभ्यासक्रमच नाही, अशी माहितीही माळी यांनी दिली.