पुणे विद्यापीठाच्या मार्चमध्ये झालेल्या परीक्षांमध्ये कॉपी केलेल्या काही विद्यार्थ्यांचे राखून ठेवलेले निकाल विद्यापीठाने अजूनही दिले नसून ऑक्टोबरच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
विद्यापीठाच्या मार्च २०१३ मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये कॉपी केलेल्या वाणिज्य शाखेच्या काही विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने अजूनही राखून ठेवले आहेत. मंगळावारपासून (८ ऑक्टोबर) ऑक्टोबरच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. मात्र, आधीच्या परीक्षेचा राखून ठेवलेला निकाल अजूनही हातात पडलेले नाहीत किंवा विद्यापीठाकडून या विद्यार्थ्यांना निकालाबाबतही काही कळवण्यात आलेले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी संभ्रमात आहेत.
 विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाकडून राखून ठेवण्यात येतात. त्यावर विद्यापीठाच्या समितीकडून सुनावणी घेतली जाते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांला दंड करून निकाल दिला जातो. निकाल जाहीर झाल्यानंतर साधारण दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये ही प्रक्रिया होणे अपेक्षित असते. मात्र, या वेळी अजूनही काही विद्यार्थ्यांची सुनावणीच झालेली नाही, अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली. या विद्यार्थ्यांची सुनावणी सोमवारी घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, पुढील परीक्षा मंगळवारपासूनच सुरू होत असल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.