पुण्यात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येत असून त्याखालोखाल स्त्रियांमधील स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशयमुखाचा कर्करोग अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पुणे कॅन्सर रजिस्ट्रीच्या गेल्या दोन वर्षांतील माहितीवरून ही बाब समोर आली आहे.
कॅन्सर रजिस्ट्रीत शहरातील १२ मोठय़ा रुग्णालयांमधून कर्करोगासंबंधीची माहिती एकत्रित केली जाते. या माहितीवरून शहरात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण १५ ते २० टक्के, तर स्त्रियांमधील स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण १० ते १५ टक्के असल्याचे दिसून आले आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथोलॉजिस्ट डॉ. कल्पना कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. सध्या पुण्यातील कर्करोगासंबंधीची सुमारे ७० टक्के माहिती कॅन्सर रजिस्ट्रीत जमा होते. अधिक रुग्णालयांनी या रजिस्ट्रीमध्ये भाग घेऊन आपल्याकडील माहिती कळवावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, ‘‘पूर्वी स्त्रियांमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक होते. मात्र गेल्या दहा वर्षांत हे प्रमाण कमी होऊन स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढताना आढळत आहे. या दोन्ही प्रकारच्या कर्करोगांमध्ये लवकर रोगाचे निदान होणे महत्त्वाचे ठरते. स्तनांच्या कर्करोगासाठी स्वस्तन तपासणी आणि वयाच्या चाळिसाव्या वर्षांनंतर ‘मॅमोग्राफी’ ही तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तर गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी चाळिशीनंतर ‘पॅप स्मिअर’ ही तपासणी करून घेणे गरजेचे आहे. हा कर्करोग ‘एचपीव्ही’ या विषाणूमुळे होत असल्यामुळे त्याचा लसीद्वारे प्रतिबंध शक्य आहे. असे असले तरी स्त्रियांमध्ये या दोन्ही कर्करोगांविषयी जागृती कमी असून त्या स्वत:ची तपासणी करून घेण्यास पुढे येत नसल्याचेच दिसून येते. नवजात बाळाला मातेने स्तनपान करणे हेही मातेचा स्तनांच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरते.’’