भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले होते. त्याचा अहवाल राज्यशासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार हिंसाचारातील नुकसान भरपाईसाठी शासनाकडून एक कोटी रूपयांचा निधी शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर तातडीने नुकसान भरपाई देण्यास सुरूवात करण्यात येणार आहे.

भीमा कोरेगाव येथे एक आणि दोन जानेवारीला झालेल्या हिंसाचारात खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले आहेत. या हिंसाचारामध्ये ९ कोटी ४८ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. १६९ ठिकाणी करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये ८८ चारचाकी गाडय़ा, ६७ दुचाकी, १४ घरे, तीन बसेस, आठ ट्रक, ६३ हॉटेल आणि दुकाने आदींचा समावेश आहे. भीमा कोरेगाव आणि सणसवाडी अशा दोन गावांमध्ये मिळून एकूण ९ कोटी ४८ लाख ५४ हजार ८६५ रूपयांचे नुकसान झाले आहे. भीमा कोरेगाव या गावात ७ कोटी ५ लाख ४४ हजार रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते, सणसवाडी गावात २ कोटी ४३ लाख १० हजार रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्यांमध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहने, घरे, दुकान, गॅरेज, बस, ट्रक, जेसीबी, अग्निशमन दलाचे वाहन आणि हॉटेल यांचा समावेश आहे.

शिरूर नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून नुकसानीचे पंचनामे तयार करण्यात आले आहेत. या पथकामध्ये महसूल विभागाचे मंडल अधिकारी, ग्रामसेवक आणि पोलीस प्रशासनाच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या पथकाने १६९ ठिकाणी पंचनामे करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला होता.

भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यासाठी शासनाकडून एक कोटी रूपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होतील. त्यानुसार, एखाद्या वस्तूचे नुकसान झाल्यास त्याचा किती मोबदला द्यायचा, याचे मापदंड राज्य शासनाकडून निश्चित करण्यात आले आहेत. त्याबाबत २०१६ ला शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रत्येक गोष्टीच्या नुकसानीचे कसे मूल्यांकन करायचे, हे शासन निर्णयात स्पष्ट केले असून त्यानुसारच नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसेच बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या वाहनांचे नुकसान झालेल्याची पंचनामा पथकाकडे असलेल्या माहितीनुसार त्यांनाही नुकसान भरपाई देण्यात येईल.        – सौरभ राव, जिल्हाधिकारी