राज्यातील ५६ हजार मुले अद्यापही शाळेपर्यंत पोहोचू शकली नसल्याची नोंद राज्याच्या शिक्षण विभागाने दोन महिन्यांपूर्वी केली. मात्र, त्यानंतर त्यातील किती मुले प्रत्यक्षात शाळेत आली याबाबत शिक्षण विभागाच अनभिज्ञ आहे. त्यामुळे शालाबाह्य़ मुले शोधण्याचे विभागाचे प्रयत्न हे नुसतेच दाखवण्यापुरतेच होते का असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
राज्यातील शालाबाह्य़ मुलांचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभागाने मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जुलै महिन्यात राज्यभरात शालाबाह्य़ मुलांचा शोध घेण्यात आला. त्या पाहणीत ६ ते १४ या वयोगटातील राज्यात साधारण ५६ हजार मुले कधीच शाळेत गेलेली नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर या आकडेवारीवरून झालेल्या वादात विभागाची ही योजनाच थंडावल्याचे दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पुन्हा एकदा राज्यभर सर्वेक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, तोपर्यंत यापूर्वी सापडलेल्या मुलांपैकी किती मुले प्रत्यक्ष शाळेत दाखल झाली, कोणत्या शाळेत, वर्गात दाखल झाली याची कोणतीही नोंद अद्यापही शिक्षण विभागाकडे नाही.
शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना वयानुसार वर्गात दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र, या मुलांना वर्गात कसे सामावून घ्यायचे याचे प्रशिक्षण किंवा सूचनाही शिक्षकांना देण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती शिक्षकांनी दिली. सर्वेक्षण झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून पुढील सूचना मिळाल्या नसल्याचीही तक्रार काही जिल्ह्य़ातील शिक्षकांनी केली आहे.